कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ) दुग्‍ध व्‍यवसायात क्रांती करून ग्रामीण जीवनमान उंचावलेले आहे. लाखो दूध उत्‍पादक, संचालक अधिकारी व कर्मचारी यांच्‍या अथक प्ररिश्रमातून दुग्‍ध व्‍यवसाय यशस्‍वी केला आहे. संघाच्‍या विविध योजनामुळे दूधवाढीसाठी उत्‍पादकांना प्रोत्साहन मिळत आहे. यामुळेच गोकुळ हा सहकारामधील अग्रणी दूध संघ आहे, असे प्रतिपादन महानंदचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले.

गोकुळ संघाला महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) चेअरमन, संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी आज (शनिवार) भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते. गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

देशमुख पुढे म्‍हणाले की, महाराष्‍ट्रातील खासगी संघाना व परराज्‍यातील अमूल सारख्‍या दूध संघाना टक्‍कर देण्‍यासाठी गो‍कुळने पुढाकर घ्‍यावा. तसेच महानंद व राज्‍यातील इतर सहकारी संघाना मार्गदर्शन करण्‍याची भूमिका गोकुळने घेणे काळाची गरज आहे.

महानंदचे व्‍हा. चेअरमन डी. के. पवार म्‍हणले की कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे भौगोलिक  वातावरण दूध उत्पादनासाठी पोषक व पूरक आहे. दूध उत्पादकांना गोकुळमुळेच अर्थिक स्‍थैर्य मिळाले आहे.

यावेळी महानंदचे संचालक विनायक पाटील, सुभाष निकम, गोकुळचे संचालक शशि‍कांत पाटील-चुयेकर, बाळासो खाडे, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, महानंदचे कार्यकारी संचालक शामसुंदर पाटील महानंदचे डॉ. दिनेश सावंत, आर. के. पाटील, भावेश पाटील, रमेश ढवळे आदी उपस्थित होते. ज्येष्‍ठ संचालक अरूण डोंगळे यांनी आभार मानले.