नागपूर (प्रतिनिधी) : राज्यातील गुंतवणुकीवर महाविकास आघाडीचे नेते उदासीन होते, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी केली आहे. आघाडीच्या काळात असे उद्योग राज्याबाहेर गेले तेव्हा आम्ही राजकारण केले नाही, असेही मुनंगटीवार म्हणाले.

माध्यमांशी बोलताना मुनंगटीवार म्हणाले की, फॉक्सकॉनबद्दल विरोधकांचे आरोप तर्कशून्य आहे. काँग्रेस नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नॅनो महाराष्ट्रात येणार होता, तो प्रकल्प गुजरातमध्ये गेला, तेव्हा आम्ही काही म्हटले नाही. महाविका आघाडीचे सरकार असताना अनेक उद्योग बाहेर गेले; परंतु आम्ही असे राजकारण केले नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात भूमिका स्पष्ट आहे की, राज्याच्या औद्योगिक विकासासाठी धोरणे आखली जाणार आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक करणार असल्याचे वेदांता यांनी स्पष्ट केले आहे, असेही मुनंगटीवर म्हणाले.

गेले आठ महिने महाराष्ट्रात उद्योग लावण्याबाबत उद्योगपती चर्चा करत होते, तेव्हा वाटाघाटी होत होत्या. तेव्हा हे महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते, अशी टीकाही मुनंगटीवार यांनी केली आहे. जैतापूर आणि नाणार प्रकल्पावर शिवसेनेने भूमिका बदलली होती. भूमिका बदलल्याने त्यांना सत्तेवरुन दूर जावे लागले. जनतेच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जे स्थान मिळवून दिले होते, त्याला आता धक्का बसला आहे, असेही मुनंगटीवार म्हणाले.