कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर कॅन्सर सेंटर २००० सालापासून रुग्णांसाठी जीवनदायी ठरले आहे.  येथे आता आणखी एका अनोख्या उपचार पद्धतीला प्रारंभ झाला आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात प्रथमच बोन मँरो ट्रान्सप्लांट (BMT) ही उपचारपद्धती दोन रुग्णांवर यशस्वीरीत्या पार पडली आहे. याचा लाभ कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना होणार असल्याची माहिती डॉ. अभिजित गणपुले, डॉ. अनिकेत मोहिते आणि डॉ. निलेश धामणे यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले की, कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही उपचार पध्दती सुरु करण्यात आली आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात प्रथमच दोन यशस्वीरीत्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट प्रकिया संपन्न झाली आहे. या उपचार पद्धतीमध्ये सदोष काम करणाऱ्या रोगग्रस्त अस्थिमज्जा (बोन मॅरो) पूर्णपणे नष्ट करून त्या जागी निरोगी अस्थिमज्जांचे प्रत्यारोपण होते. ही उपचार पद्धती सर्वसाधारणपणे १५ ते १ महिना चालू शकते. बाकी मज्जा पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे वेगवेगळे संसर्ग होण्याचा धोका खूप जात असतो. ही गुंतागुंतीची उपचारपद्धती यशस्वी होणे आमच्या प्रशिक्षित टीमच्या अथक प्रयत्नामुळे शक्य झाले आहे. या उपचार पद्धतीचा वापर कर्करोगासह इतर रक्ताच्या आजारामध्ये होऊ शकतो.

या वेळी ही उपचार पद्धती घेतलेल्या दोन रुग्णांनी आपला अनुभव व्यक्त करून डॉक्टरांसह रुग्णालयाचे आभार मानले.