इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने १५ व्या वित्त आयोगातून पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा योग्य प्रमाणात व्हावा. यासाठी कट्टीमोळा डोह येथून पाणी उपसा करण्यासाठी वाढीव नळ पाणी योजना करण्यात येत आहे. या योजनेचा भूमीपूजन आणि पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आज (गुरुवार) आ. प्रकाश आवाडे आणि नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.

माजी खा. राजू शेट्टी, माजी आ. सुरेश हाळवणकर, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक मदन कारंडे, संजय कांबळे, अजित जाधव,  गीता भोसले, बिलकिस मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कट्टीमोळा येथील जागेचे मालक बापूसो मगदूम यांनी या योजनेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आ. आवाडे यांनी, इचलकरंजी शहरवासियांना दररोज पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यातूनच कट्टीमोळा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कृष्णा योजना गळतीचे कामही लवकरच पूर्ण होईल. तसेच शहरात विविध ठिकाणी शुध्द पेयजल प्रकल्पांच्या माध्यमातून चोवीस तास पाणी दिले जाणार आहे. सांगली नाका, जवाहरनगर आणि गावभाग अशा तीन ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार असून त्याद्वारे कधीही पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे सांगितले.

यावेळी पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, जि.प. सदस्य राहुल आवाडे, स्वप्निल आवाडे, माजी उपनगराध्यक्ष बाळासो कलागते, विठ्ठल चोपडे, नगरसेवक सुनिल पाटील, संजय कांबळे, आरोग्य सभापती संजय केंगार, अजित जाधव, प्रकाश मोरबाळे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, आदी उपस्थित होते.