गारगोटी (प्रतिनिधी) : जलशक्ती मंत्रालय, (भारत सरकार) पाणीपुरवठा व स्वच्छता समिती (महाराष्ट्र् शासन) यांच्या माध्यमातून गावपातळीवर ‘जलजीवन मिशन’ या योजनेची ‘हर घर नल से जल’ हे ब्रीदवाक्य घेऊन अंमलबजावणी सुरू आहे. गारगोटी येथील मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ग्रामस्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षणास सुरवात केली आहे.

प्रथम टप्प्यात भुदरगड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पाणी व स्वच्छता समिती सदस्य यांचे ४ दिवसीय निवासी प्रशिक्षण आदमापूर व गडहिंग्लज येथे सुरू आहे.

सदर प्रशिक्षणामधून जलजीवन मिशन तोंड ओळख, अंमलबजावणी, नेतृत्व विकास, पाणी गुणवत्ता, पर्यावरण, लोकसहभाग, गावकृती आराखडा, नियोजन, देखभाल दुरुस्ती आदी विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच एकदिवसीय अभ्यास सहलीचे आयोजन ही केले आहे. या उपक्रमास कोल्हापूर जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग, पंचायत समिती भुदरगड यांचे सहकार्य लाभले आहे.