कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांची ७३ वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. कारखाना प्रांगणातील श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन या मुख्य कार्यालयासमोरील पुतळ्याचे पूजन चेअरमन समरजितसिंह घाटगे यांचे हस्ते करण्यात आले. तसेच कारखान्याचे आराध्य दैवत राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व कागल संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या प्रतिमेचेही पूजन केले.

यावेळी कारखान्याच्या ज्येष्ठ संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्व. राजेंचे कार्य हे पिढ्यानपिढ्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ते असेच यापुढे रहावे म्हणून या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ६७ जणांनी रक्तदान केले. यावेळी कोरोना बाबतचे सर्व नियम पाळून हे शिबीर  छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आले. यानिमित्ताने कारखाना परिसरात  वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी २०० हुन अधिक झाडे लावणेत आली.

दरम्यान दिवसभरात स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे,  कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, सर्व संचालक, संचालिका रुक्मिणी पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण शाहू ग्रूपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.