पन्हाळा तालुक्यात पावसाचा कहर : भूस्खलनामुळे १७ घरांना धोका, ६१ घरांत घुसले पुराचे पाणी

0
302

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पश्चिम भागात कुंभी, कासारी आणि मणीकर्णिका नदीच्या पुराचे पाणी ६१ घरांत घुसले आहे. पूर्व भागात भूस्खलनाने १७ घरे बाधित झाली असून १५ बंधारे पुराच्या पाण्याखाली गेल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात चोवीस तासांत १९५ मिमी पाऊस झाला आहे.

मानवाडमधील ४ घरे, पिसात्रीमधील २, पोर्ले तर्फे बोरगावमधील १, बाजारभोगावमधील २९, नणुंद्रेमधील ५ अशा सुमारे ६१ घरांत पुराचे पाणी घुसले आहे. यामधील ३०५ लोकांना प्रशासनाने स्थलांतरीत केले आहे. पश्चिमेकडील नावली पैकी जांभळेवाडी मधील ६, बोरवडे पैकी मराठवाडी मधील १०, आपटीमधील १ घराला भूस्खलनाने धोका निर्माण झाला आहे. येथील सुमारे १०० लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे.

तालुक्यातील १५ बंधारे पाण्याखाली गेल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे यातील कुंभी नदीला पुर आल्याने गोठे-परखंदळे, आकुर्डे-सुळे, वाघुर्डे-सुळे, कासारी नदीवरील पोहाळे- बाजारभोगाव, बोरगांव-पोहाळे, बाजारभोगाव-काउरवाडी, बाजारभोगाव- पोर्ले, पोर्ले-पाटपन्हाळा, पोर्ले-माजगांव, देवठाणे-कसबा ठाणे, वारणा नदीवरील काखे-मांगले, सावर्डे-मांगले, सावर्डे-कांदे, आरळे ओढ्यामुळे आरळे-सातवे, मोहरे ओढ्यामुळे सातवे-मोहरे असे १५ बंधारे पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे

पन्हाळा शहरात पावसाने व जोराच्या वाऱ्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीजवितरण खंडित झाले होते, तर पन्हाळ्याच्या पायथ्याला असणाऱ्या गावात नदीसारखे पाणी वाहात होते. काहींच्या घरात पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.