आंबर्डे येथील दलित वस्तीला भूस्खलनाचा धोका : संरक्षण भिंत बांधण्याची मागणी

0
28

कळे (प्रतिनिधी)  : आंबर्डे (ता.पन्हाळा) येथे दरड पोखरून पाणवठयाकडे जाणारा रस्ता केल्याने दलित वस्तीतील ५ घरांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. जीव मुठीत घेऊन ही कुटुंबे राहत आहेत. या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची  मागणी कुटुंब प्रमुखांनी केली आहे.   

पूर्वीपासून पाणवठा रस्ता दोन शेतकऱ्यांच्या  शेतीतून गेला होता. रस्त्याच्या पुढील बाजूस स्मशान शेड असून रस्ता अरुंद व कच्चा असल्याने पावसाळयात चिखलातून जावे लागत असे. त्यामुळे गैरसोय होत होती. दोन वर्षापूर्वी गावाला पाणी योजना मंजूर झाली.  जॅकवेल उभारताना साहित्य ने-आण  करण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी ग्रामपंचायतीने जुन्या पायवाटेची जागा संबंधित शेतकऱ्याला सोडून त्याच्यावरील बाजूने त्याची निम्मी व दलित समाजाच्या घरामागील दरड पोखरून रस्ता तयार केला.

या ठिकाणी १५ ते २० फुटाची दरड तयार झाली होती. त्यावेळी दलित समाजाने विरोध केला होता. परंतु ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढून संरक्षण भिंत बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही भिंत बांधलेली नाही. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड ढासळू लागली आहे. दरडेवरील झुडपांची मुळे मोकळी झाली आहेत. दरडेपासून २ ते ३  फुटावर घरांच्या भिंती आहेत. पुन्हा अतिवृष्टी झाल्यास भिंती ढासळण्याचा धोका आहे. त्यामुळे ५  घरांना धोका निर्माण झाला आहे.

तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी दलित समाजाची दिशाभूल करून दरड पोखरली आहे. पुन्हा अतिवृष्टी झाल्यास घरांना धोका आहे. तरी शासनाने त्वरीत या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी. अन्यथा सर्व कुटुंबासहित तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.

– बाबूराव कांबळे,  माजी उपसरपंच, आंबर्डे 

सदर ठिकाणची माती अगोदरच बंधाऱ्यासाठी नेण्यात आली आहे. तसेच या बाजूला पाणवठा व स्मशानभूमी असल्याने रस्ता रुंद केला असून तशी ग्रामपंचायत दफ्तरी नोंद आहे. त्यामुळे संबंधित घरांना असणारा धोका लक्षात घेता हा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल.

– सुरेश बोरवणकर, ग्रा.पं.सदस्य, आंबर्डे