गडहिंग्लज (प्रतिनिधी)  :  चंदगड तालुक्यातील सडेगुडवळे आणि पुंद्रा गावच्या हद्दीतील शेकडो एकर सरकारी जमिनी तलाठी आणि शासकीय यंत्रणेला हाताशी धरून धनदांडग्यांनी लाटल्या. त्यासाठी सुमारे १९५० पासूनच्या कागदपत्रांत खाडाखोड करून त्या जमिनी नावावर करून घेण्याचा घाट घातला. ‘त्या’ जमिनीची किंमत कोट्यवधी रुपयांत असताना देखील हा गुन्हा मात्र चंदगड पोलीस ठाण्याच्या दफ्तरी ‘अदखलपात्र’ नोंदविण्यात आला. याचे गौडबंगाल काय याबाबत तालुक्यासह जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

साधी शे- दोनशे रुपयांची मटक्याची कारवाई असेल किंवा पाच- दहा हजाराची बेकायदा दारु विक्रीची कारवाई असेल पण त्याचा पोलीस यंत्रणा ‘गाजावाजा’ करते. प्रसिद्धीमाध्यमापर्यंत तयार बातमी पोहचते. ‘अवैध दारुसाठ्याप्रकरणी अमुकास अटक’ या मथळ्याखाली पोलिसांच्या पथकासह फोटो झळकतो. पण कोट्यवधीची सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी मात्र ‘गुपचुप’ अदखलपात्र गुन्हा कसा नोंद होऊ शकतो असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

शिवाय ‘त्या’ गुन्ह्याच्या तपासासाठी खास आर्थिक गुन्हे शाखेला चंदगडमध्ये पाचारण करण्यात आले. पण तपास अधिकाऱ्यांनी मात्र पोलीस ठाण्याऐवजी चंदगडमधील एका हॉटेलमध्ये बसून ‘तपास’ केला आहे. ही खास सोय कुणासाठी हा प्रश्नही सध्या अनुत्तरित आहे. शिवाय संशयितांना अटक केली, त्यांना न्यायालयापुढे उभे केले, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली याबाबतची कोणतीही माहिती अजिबात बाहेर ‘लिक’ होणार नाही याची पोलिसांनी दक्षता घेतली, ती कशासाठी?

थोडक्यात, फाटकवाडी तलावानजिकच्या निसर्गरम्य परिसरातील शेकडो एकर जमीन ‘त्या’ धनदांडग्यांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून लाटली आहे. त्याबाबत गुन्हा दाखल झाला तरी पोलीस यंत्रणेला हाताशी धरून कातडीबचावाचे धोरण अवलंबिले आहे. याबाबत ‘लाईव्ह मराठी’ने निर्भीडपणे आवाज उठविला आहे. आता प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार?  ‘त्या’ धनदांडग्यांवर कारवाई करून शासकीय जमीन परत मिळविणार की त्यांनी ओतलेल्या पैशाच्या राशीत सगळंच झाकून जाणार याकडे आता चंदगड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या नजरा लागल्या आहेत.