भू-विकास बँकेच्या थकीत शेतकरी कर्जदारांच्या कर्जमाफीचा निर्णय…

0
28

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील भू-विकास बॅकेच्या थकीत शेतकरी कर्जदारांची कर्जमाफी करण्याचा निर्णय मंत्रालयीन बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे. शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील या थकित शेतक-यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्द्ल भूविकास बॅक शेतकरी बचाव कृती समितीच्या शेतक-यांनी त्यांचा सत्कार करून आभार मानले. तसेच या थकीत कर्जदार शेतक-यांच्या प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडल्याबद्दल ‘लाईव्ह मराठी’चेही शेतक-यांनी आभार मानले.

कागल तालुक्यातील सोनाळी येथील नागनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या ३१ खातेदार शेतक-यांच्या नावावरील ६ कोटी १९ लाख ३२ हजार ७२७ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. १९९३ मध्ये हि पुरवठा संस्था सुरु करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत काही शेतक-यांच्या बांधापर्यंत पाण्याचा थेंब देखील पोहचलेला नव्हता. त्यामुळे शेतकरी विनाकारण कर्जाच्या विळख्यात अडकलेले होते. याबाबत शेतकऱ्यांनी संघटित होवून अनेक वर्षापासून लढा उभा केला होता. गेली २३ वर्षे कर्जाच्या खाईत होरपळणा-या शेतकऱ्यांच्या कुटूंबात कर्जमाफीमुळे आता समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी महादेव कोरे, रामचंद्र भिउगडे, विजय निकम, संदिप कपले, मारुती पोवार, बाळासो कातोरे, सुरेश कोरे, बसवराज कोरे, सागर डावरे, उत्तम पोकलेकर, शेतकरी उपस्थित होते.