कोल्हापूर (प्रतिनिधी) : वर्षभराच्या कालखंडात दुसर्‍यांदा मोठा लॉकडाऊन व तोही शंभर दिवसांचा. हा कालखंड व्यापार्‍यांसाठी अत्यंत कठीण व खडतर होता. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या व्यापार्‍याला आता व्यापार सुरू करता येईल याचा विशेष आनंद होतोय, असे सांगून आता व्यापाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय करावा, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.

आज (शनिवार) नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारपासून सर्व दुकाने खुली करण्यात परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश जारी केला. याबाबत ललित गांधी यांनी पत्रक काढून या निर्णयाचे स्वागत केले. गांधी यांनी पत्रकात म्हटले आहे की, व्यापार्‍यांनी संघटितपणे लढ्याला साथ दिली व तीव्र संघर्षानंतर मिळालेले यश अधिक उल्लेखनीय असते. या लढ्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, आरोग्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले. या सर्वांना धन्यवाद. व्यापार्‍यांनी आता सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. दुकानाच्या वेळा वाढविण्यासाठी यापुढे प्रयत्न करू, अशीही ग्वाही त्यांनी दिली.