कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असूनही सरकारने व्यापार सुरू करायला परवानगी न दिल्याने व्यापार्‍यांचा अपेक्षाभंग झाला आहे. यामुळे व्यापारी अत्यंत संतप्त झाले असून त्यांच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापारी टोकाची भूमिका घेतील, असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिला आहे.

शासन व प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सर्व सनदशीर मार्गाने आमच्या व्यथा मांडुनही सरकारने निर्णय न घेणे व्यापार्‍यांवर अन्याय आहे. आजच्या कॅबिनेट मिटींगमध्ये अनुकूल निर्णय होण्याची अपेक्षा होती. पण व्यापार्‍यांच्या पदरी निराशा आली आहे. कोणताही शास्त्रीय आधार नसलेला तोडका मोडका लॉकडाऊन कोरोनावर नाही तर व्यापारी व कर्मचार्‍यांच्या कुटुंबावर आघात करत आहे. व्यापारी आवश्यक ती खबरदारी घेतील. लसीकरण करून घेत आहेत. आता आणखी वाट बघणे शक्य नाही म्हणुन ताबडतोब परवानगी द्यावी. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा व्यापारी टोकाची भूमिका घेतील, असा इशारा गांधी यांनी दिला आहे.

व्यापार्‍यांची निर्णायक भूमिका जाहीर करण्यासाठी शुक्रवार १६ जुलै रोजी राजारामपुरी येथे जिल्ह्यातील व्यापार्‍यांची व्यापक बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.