कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. त्यांनी आज (मंगळवार) मुंबई येथे पालकमंत्री सतेज पाटील यांना भेटून याबाबतचे निवेदन सादर केले.

गांधी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, गांधीनगर, हुपरी, आजरा, चंदगड, राशिवडे, बांबवडे, कोडोली, पेठवडगाव, मुरगूड, कागल या प्रमुख बाजारपेठांच्या गावाबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार ठप्प असल्याने अर्थकारण बिघडले आहे. राज्याच्या व्यापारात जिल्ह्याचा वाटा टिकून ठेवण्यासाठी कोल्हापूरप्रमाणेच संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद यासह ग्रामपंचायत स्तरावरील व्यापारही सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची मागणी योग्य आहे. जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींसमवेत उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन लवकरात लवकर हा व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळवून देऊ. शासनाच्या निकषांमध्ये पात्र होण्यासाठी जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. या वेळी ललित गांधी, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य संदीप भंडारी, डी. सी.सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते.