लाकूडवाडीच्या दृष्टिहीन ‘चाळूमामां’चा सोशल मीडियावर धुमाकूळ (व्हिडिओ)  

0
2214

आजरा (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस सोशल मीडिया गाजवतो आहे ७० वर्षाचा चाळू मामा… हे मामा आहेत आजरा तालुक्यातील लाकुडवाडी गावचे… मामांना तशी लहानपणापासून भजन कीर्तन, पोवाडा, पाळणा, गवळण गाण्याची मोठी हौस… त्यांनी पंचक्रोशीतील गावाच्या नावावरून उपहासात्मक गायलेला पाळणा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

चाळूमामा गिलबिले यांची आकलन व बुद्धिमत्ता प्रचंड आहे. केवळ दुसरी शिकलेल्या मामांना पंचक्रोशीतील गावांची महती तसेच ती गावे कशासाठी प्रसिद्ध आहेत, हे त्यांनी गायलेल्या पाळण्यातून समजते. काही गावाबद्दल उपहासात्मक पाळणा असला तरी त्या गावांना हिनविण्यासाठी नव्हे, तर यमक जुळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.

सर्व भजने, गवळणी, यमक त्याचबरोबर पोवाडे मामांना तोंडपाठ आहेत. शिवाय त्यांचा आवाजही मधूर आहे. मामा दृष्टीने जरी कमी असले, तरी गळ्याने अधिक गोड आहेत, ते विवाहित असून पत्नी भावाबरोबर एकत्र राहतात, त्यांना दोन मुले असून ती नोकरीनिमित्त मुंबई येथे आहेत. चाळूमामा सध्या त्यांच्या गायन शैलीने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत.