पंढरपूर (प्रतिनिधी) : आळंदी आणि देहूवरून निघालेले लाखो वारकरी आता पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करून पुढे नामदेव पायरीच दर्शन घेत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे वारकरी चालत पंढरपूरपर्यंत पोहोचले आहेत. नामदेव पायरी बरोबरच ते विठुरायाचे देखील दर्शन घेणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले वारकरी अगोदर चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि नंतरच विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहतात. वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून चंद्रभागेमध्ये दुथडी भरून स्वछ पाणी सोडण्यात आले आहे. काही हुलडबाज तरुण देखील चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी येतात. यावेळी काही अवचित प्रकार घडू नये म्हणून वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी २४ तास एनडीआरएफचे पथक चंद्रभागेमध्ये गस्त घालत आहे. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये कोणीही हुल्लडबाजी करू नये, असे आवाहन एनडीआरएफच्या पथकाने केले आहे.

लाखो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पायी चालत पंढरपूर या संत नगरीमध्ये आले आहेत. आषाढी एकादशीला आलेल्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

आजही देशात सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपूरमध्ये लाखो भाविक-वारकरी आले आहेत. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर विठ्ठल मंदिर व बहुतांश पालखी महामार्ग माढा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने वारकऱ्यांसाठी या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून वारकरी व विठ्ठल भक्तांना मोदी यांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत.