मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या  निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केली.

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने हा बंद पुकारला आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही चर्चा करणार आहोत. हा बंद पक्षाच्यावतीने असून सरकारच्या वतीने नाही, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.