कुरुंदवाड पालिकेची ६ जून रोजी अंतिम प्रभाग रचनेची घोषणा…

0
20

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरूंदवाड पालिकेच्या संभाव्य पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आराखड्याबाबत प्रभाग क्रमांक चार आणि दोनमधून दोन हरकती दाखल झाल्या होत्या. लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे आराखडा योग्य असल्याचा निर्वाळा देत हरकतदारांची प्रशासक निखिल जधाव यांनी हरकत फेटाळून लावली. काल (शुक्रवार) सुनावणीच्या अंतिम दिवशी हरकतीवर सुनावणी पूर्ण झाल्याने प्रभाग रचनेवर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे.

कुरुंदवाड पालिकेत नगरसेवकांची संख्या १७ असून नव्या अध्यादेशानुसार तीन नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने द्विसदस्यीय वीस प्रभागाची रचना करण्यात आली आहे. जनगणनेनुसार २२ हजार ३७२ इतकी लोकसंख्या कुरंदवाड येथील आहे. गेल्या पालिका निवडणुकीत मतदारांची संख्या १९ हजार १६७ इतकी होती. विधानसभा निवडणुकीत २० हजार ६०० इतकी मतदार संख्या होती. तर आता १ हजार ४०० मतदारांची संख्या वाढली आहे. प्रत्येक प्रभागात सुमारे अडीच हजार लोकसंख्येनुसार  प्रभाग रचना करण्यात आली आहे.

तसेच प्रभाग क्रमांक चार आणि दोन हे प्रभाग मोठे झाले आहेत. या प्रभागात वाढविण्यात आलेला भाग कमी करण्यासाठीची हरकत तानाजी आलासे आणि प्रफ्फुल पाटील यांनी घेतली होती. प्रशासक जाधव, नगररचनाकार नितीश कदम, प्रणाम शिंदे यांनी प्रभागाची लोकसंख्या तपासून रचना व आदीबाबी तपासल्या असता त्या योग्यच आहेत.यामध्ये बदल करावयाचे झाल्यास इतर प्रभागात लोकसंख्या वाढून सर्वच प्रभागातील रचनेत परिणाम होऊ शकते. प्रभागातील लोकसंख्येचे लक्ष पूर्ण करण्यासाठी वाडी-वस्ती घ्यावी लागली तर त्याठिकाणी नकाशा मोठा होणे म्हणजे प्रभाग मोठा होणे असा भाग येत नाही. लोकसंख्येच्या निकषावर सदरची रचना योग्य असल्याचे सांगत हरकत फेटाळून लावली.

तसेच ६ जून रोजी अंतिम प्रभाग रचना फायनल होणार असून प्रशासन यामध्ये काय बदल करते ? का हीच प्रभाग रचना अंतिम होणार ? याकडे इच्छुकांचे आणि नागरिकांची लक्ष लागून राहिले आहे.