कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष फारूख जमादार यांचा राजीनामा

0
41

 शिरोळ (प्रतिनिधी) : कुरुंदवाड  नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपनगराध्यक्ष फारूख जमादार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला . मंगळवारी (दि.२९) रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. उपनगराध्यक्षपदी कॉग्रेस  नेत्या गीता बागलकोटे यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुरुंदवाड नगरपालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सर्व सदस्यांना पदाची समान संधी मिळावी, यासाठी ठराविक कार्यकाल ठरवण्यात आला आहे.  त्यानुसार कार्यकल संपुष्टात आल्याने उपनगराध्यक्षपदाचा फारुख जमादार यांनी राजीनामा दिला.  उपनगराध्यक्षपदी कॉग्रेसच्या गीता बागलकोटे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून नेत्याच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

दरम्यान,  उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून  पुढील दिशा ठरवू,  असे भाजपचे पक्षप्रतोद उदय डांगे यांनी सांगितले.  त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार की निवडणूक प्रक्रियाद्वारे होणार ? याची उत्सुकता लागली आहे.