कागल (प्रतिनिधी) : आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमधील कुरणे वसाहतीमधील ५४ झोपडपट्टीधारकांना हक्काची मालकीपत्रे देण्यात आली. नियमितीकरण झालेली कुरणे वसाहत ही राज्यातील पहिलीच झोपडपट्टी ठरली आहे. यासाठी आ. मुश्रीफ आणि नगरसेवक सतीश घाडगे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना झोपडपट्टीधारकानी व्यक्त केली. आज (शनिवार) या ५४  झोपडपट्टीधारकांच्या हस्ते आ. मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.    

कागल-मुरगुड मार्गावरील वड्डवाडी येथील कुरणे वसाहतीमध्ये या झोपड्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या नियमितीकरणाचा प्रश्न प्रलंबित होता. या नियमितीकरणामुळे शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपड्या उभारलेल्या ५४  झोपडपट्टीधारकांना याचा लाभ झाला आहे.

आ. मुश्रीफ म्हणाले की, घटस्थापने दिवशी त्या ५४ झोपडपट्टी धारकांच्या स्व-मालकीच्या हक्काच्या घरात देव-देवतांची प्रतिष्ठापना होणार असून याचे मला आत्मिक समाधान आहे. शहरातील राजीव गांधी वसाहत, बिरदेव वसाहत, रेल्वेलाईन वसाहत, स्मशानभूमी लाईन वसाहत, सांगाव नाका, मातंग वसाहत, पसारेवाडी वसाहत यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आ. मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी जि.प. सदस्य युवराज पाटील,माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, माजी नगराध्यक्ष नवल बोते, नगरसेवक सतीश घाटगे, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक विवेक लोटे, संदीप भुरले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष  संजय चितारी, भरत सोनटक्के आदी उपस्थित होते.