कुमार सानूच्या मुलाचा मस्तवालपणा : ‘बिग बॉस’मध्ये मराठी भाषेचा अवमान

0
64

मुंबई (प्रतिनिधी) : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमध्ये जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. जान हा प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा आहे. यामुळे सर्व थरातून संताप व्यक्त करण्यात होत आहे. शिवसेना आणि मनसेने कलर्स वाहिनीला सानूला या शोमधून हाकलण्याची मागणी केली आहे. राज्यात उमटलेल्या प्रक्षुब्ध भावनांचा विचार करून कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.

‘बिग बॉस’मध्ये निक्की तांबोळी आणि जान सानू यांच्यात वाद झाला. त्या वेळी निक्की ही मराठीत बोलत होती. जान सानू याने ‘मला मराठीची चीड येते’, असे संतापजनक वक्तव्य केले. हा भाग काल (२७ ऑक्टोबर) प्रसारित झाल्यानंतर मनसे, शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. ‘जान कुमार सानू, मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय’ याला अशा शब्दांत मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. तर शिवसेनेनं जानची हकालपट्टी करण्याची मागणी केली.

यानंतर कलर्सनं मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून माफी मागितली. ‘मराठी भाषेसंदर्भातल्या विधानामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही माफी मागतो. आम्ही मराठी प्रेक्षकांचा आदर करतो. कालच्या भागात मराठी भाषेविषयी जो वादग्रस्त भाग प्रसारित झाला तो आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकत आहोत. मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळं आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आम्ही सर्व भाषांचा सन्मान करतो,’ असं पत्रात म्हटलं आहे.