इचलकरंजी (प्रतिनिधी) :  कबनूर येथील संदीप मागाडे खूनाचा मुख्य सूत्रधार ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे याला आज (रविवार) शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. कुमार कांबळे याची माहिती एका खबऱ्याने पोलिसांना दिली  होती. राजकीय वैमनस्यातून २३ जानेवारीला संदीप मागाडे याचा सशस्त्र हल्ला करुन निर्घृणपणे खून करण्यात आला होता.

मागाडे खूनप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कुमार कांबळे याच्यासह  १४ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यापैकी ८ जणांना अटक करण्यात आली होती. तर कुमार कांबळे याने अटकपूर्व जामीनसाठी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने गुन्हा घडलेल्या घटनास्थळी कुमार कांबळे हा सामील असल्याचे पुरावे आहेत. कांबळे याचे गुन्हेगारी रेकॉर्ड असून मागाडे खून प्रकरणी कांबळे हा यातील मुख्य संशयित आहे. त्यामुळे पुढील तपासकामी तो आवश्यक असल्याने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.

दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुमार कांबळे आणि अन्य फरारी संशयित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु ठेवले होते. त्यानुसार एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी आज हातकणंगले येथे सापळा रचून त्याला अटक केली.