कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात एका महिलेचे घर यावर्षीच्या मुसळधार पावसात कोसळले. महिलेच्या दोन खोल्यांमध्ये गुडघाभर चिखल, अर्धे छत कोसळलेले होते. त्या महिलेला आधार दिला तो कृष्णराज महाडिक यांनी. कोल्हापुरातील उजळाईवाडी जकात नाक्याजवळ राहणार्‍या मंगल कानडे या महिलेचं पावसामुळं कोसळलेलं घर त्यांनी पुन्हा बांधून देवून महाडिक कुटुंबीयांनी आपली सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाची परंपरा कायम राखलीय.

कोल्हापुरातील उजळाईवाडी इथल्या शाहू जकात नाक्याजवळ राहणार्‍या मंगल कानडे या महिलेचे जेमतेम दोन खोल्यांचे जुने घर आहे. ती महिला मोलमजुरी करून मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरत होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडयात मुसळधार पावसामुळे कानडे यांच्या घराचे छत कोसळले. त्यामध्ये त्यांचा संसारही पाण्यातून वाहून गेला. घरामध्ये गुडघाभर चिखल झाला होता. घरात अन्नधान्याचा कण नाही, डोक्यावर छप्पर नाही, अशा अवस्थेत हताश झालेल्या मंगल कानडे यांच्या मदतीसाठी कृष्णराज महाडिक धावून गेले.

त्यांनी स्वखर्चानं ८ दिवसात मंगल कानडे यांचे घर पुन्हा बांधून दिले.त्यांच्या हक्काचा निवारा त्यांच्याकडे सुपुर्द केला. नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीमध्ये समाजाच्या मदतीसाठी धावून जाण्याची महाडिक घराण्याची परंपरा आहे. माजी खा. धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.