कराड (प्रतिनिधी) : कोयना धरणाची पाणीपातळी २ हजार १४७ फुटांवर गेली असून, एकूण पाणीसाठा ८५.३१ टीएमसी झाला आहे. धरण आतापर्यंत ८०.९७ टक्के भरले आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी आज (शुक्रवारी) सकाळी दहा वाजल्यापासून धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले आहेत. त्यामुळे ८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे.

गुरुवारी दुपारी पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने कोयना नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने जलाशयात प्रतिसेकंद ५५ हजार ४४७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

गेल्या २४ तासांत कोयनानगरला सर्वांत जास्त २०८ मि.मी., नवजाला ११५ आणि महाबळेश्वरला १७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना जलाशयाचा साठा त्यामुळे ४.७६ टीएमसीने वाढला. सलग तीन दिवस सरासरी पाच टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरण ८० टक्के भरले आहे.  कोयनानगरमध्ये तीन हजार मि.मी. पावसाचा टप्पा पार केला आहे. धरणात काल पावणेपाच टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली.