मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही रमण्णा यांनी देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची आज शिफारस केली आहे. म्हणून आता देशाच्या सरन्यायाधीशपदी आता पुन्हा एकदा मराठी माणूस विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

भावी सरन्यायाधीश असलेले न्यायमूर्ती लळीत हे मूळचे कोकणातील आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये हे त्यांचे मूळ गाव. दरम्यान सध्या न्यायमूर्ती लळीत यांचे कुटुंब रायगड जिल्ह्यातील आपटा इथे स्थायिक झाले आहे.

न्यायमूर्ती उदय लळीत यांचा जन्म मुंबईतील आंग्रेवाडी इथे झाला. त्यांनी शिरोडकर हायस्कूलमधून मराठी माध्यमातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम मुंबईतील ज्येष्ठ वकील कै. एम. ए. राणे यांच्याकडे काही वर्षे सहायक म्हणून काम केले. नंतर ते दिल्लीत गेले आणि सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्णून काम केले. स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या विशेष अधिकारांतर्गत न्या. उदय उमेश लळीत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली होती.

न्यायमूर्ती लळीत यांना यांना कायद्याचं ज्ञान किंवा बाळकडू हे अगदी लहानपणापासून मिळाले. कारण त्यांचे आजोबा ऍड. धोंडोदेव लळीत हे वकील होते, तर त्यांचे वडील अ‍ॅड. उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील होते. १९७४ ते १९७४  या काळात त्यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे. येत्या २७ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत.