महापालिकेची निवडणूक नक्की कधी होईल हे अद्याप निश्चितपणे सांगता येत नाही. पण, वातावरण हळूहळू तापू लागले आहे. पालिकेवर आपलीच सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांचे नेते रणनीती आखू लागले आहे. सत्तेपेक्षा एकमेकाला शह कसा द्यायचा हाच या नेत्यांचा प्राधान्यक्रम असणार आहे. त्यामुळेच बंद खोलीतील चर्चांचे प्रमाण वाढले आहे. मात्र चर्चा तर करायच्या आणि याबाबत विचारले तर म्हणायचे, आमची निवडणुकीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का ? त्यामुळे  ‘ताकाला गेलाच असाल तर मोगा कशासाठी लपवता’,  असे सर्वसामान्यांचे मत अगदीच चुकीचे म्हणता येणार नाही.

कोल्हापूरच्या राजकारणाचे अंतरंग सहजासहजी कळणे अवघड आहे. डोईजड होणाऱ्याला खाली कसे खेचायचे हाच नेत्यांचा हेतू असतो. प्रत्यक्ष तसे दाखवायचे नाही. पण, स्वतःचा शत्रू कोण हे निश्चित झाले की, व्यूहरचना आखायची त्यासाठी शत्रूचा शत्रू कोण याचा शोध घेऊन त्याच्याशी संधान बांधायचे अशी चाणक्य नीती अवलंबली जाते.

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि ताराराणी आघाडी हेच प्रमुख सत्तेचे दावेदार असणार आहेत. ताराराणी आघाडी आणि भाजपाचा थेट विरोधक म्हणजे दोन्ही काँग्रेस पक्ष. पण, इथे पक्षापेक्षाही या पक्षाचे नेते त्यांचे खरे विरोधक आहेत. त्यामुळे या नेत्यांनाच शह कसा द्यायचा यावर जास्त भर दिला जाणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनाच निवडणुकीत टार्गेट केले जाण्याची चिन्हे आहेत.

त्यांना शह देण्यासाठी कुणी शिरोलीतून, तर कोणी वारणेतून आणि कुणी चक्क पुण्यातून एकत्र येत आहेत. त्यांच्या बंद खोलीत तासतासभर चर्चा होऊ लागल्या आहेत. एकत्र येण्याचे ठरवल्याशिवाय हे सगळे एकत्र येणे हा योगायोग निश्चितच नाही. तासाभराच्या चर्चेत राजकारणावर आणि येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाली नाही असे नेते सांगत असले, तरी त्यावर दूधखुळाही विश्वास ठेवणार नाही.

दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधकांना आपण एकत्र आलो तर ते आपल्या पथ्यावर पडेल असे नेत्यांना वाटते. किंबहुना, ते काही अंशी खरेही आहे. हमखास निवडून येण्याची क्षमता एखाद्या उमेदवाराकडे असेल तर ताराराणी आघाडी, भाजपा आणि जनसुराज्य या उमेदवाराच्या मागे आर्थिक मदतीसह सर्व ताकद लावण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. त्यात गैरही काही नाही. त्यामुळे शत्रूला सहज शह देणे शक्य होईल. दोन्ही काँगेसबरोबर शिवसेनेची ताकद लागणार असली तरी त्यांनाही स्वतःचा पक्षाचा विचार करावाच लागणार आहे. स्वतःच्या अस्तित्वाला कोणत्याही परिस्थितीत संकटात आणणार नाही. त्यामुळे शक्तीचे विभाजन होऊन विरोधकांचा फायदा होऊ शकतो.

अर्थात, एक-दोन नेत्यांना शह देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न लपून राहात नाहीत. मग, ताकाला जाऊन मोगा लपवण्याचे कारणच काय, असा प्रश्न लोकांना पडला असेल तर त्यात वावगे काय आहे..?

ठसकेबाज