कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ म्हणजेच ‘गोकुळ’ च्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. गोकुळ म्हणजे जिल्ह्याची डेअरी असली तरी तिची ठळक ओळख म्हणजे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची मुख्य वाहिनी. ‘गोकुळ’ च्या स्थापनेपूर्वी ती एक शासकीय डेअरी होती. लालफितीचा कारभार आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव यामुळे ती फारशी चालत नव्हती. वसंत-बहार चित्रमंदिराच्या परिसरात ही डेअरी होती. अपेक्षेप्रमाणे डबघाईला आली. त्यामुळे तिचा सहकार तत्त्वावर ‘मेक ओव्हर’ करून ‘गोकुळ’ मध्ये रूपांतर करण्यात आले. तेव्हापासून गोकुळ म्हणजे ‘कुबेराचा’ खजिना झाला आहे.

गोकुळची स्थापना करताना काही चलाख लोकांनी ‘मेख’ मारून ठेवली. ती मेख आजपर्यंत कोणालाही काढता आली नाही. ती म्हणजे,  जिल्ह्याची सहकारी संस्था असली तरी व्यक्तिगत सभासद न करता संस्था सभासद करून घेण्यात आले. त्यामुळे आज ‘गोकुळ’कडे लाखो दूध उत्पादक दूध घालत असले तरी, सभासद संख्या मर्यादित राहिली. त्यामुळे मतदानाचा हक्कही त्यांनाच मिळाला. या चलाख लोकांनी त्यातही पुन्हा एक मेख मारली. संस्था ज्याच्या नावाने ‘ठराव’ करेल त्यालाच मतदानाचा हक्क मिळतो.

‘गोकुळ’ची स्थापना सहकार तत्त्वावर झाली असली तरी, हा संघ ठरावीक घराण्यांची ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कशी राहील’, यासाठी जाणीवपूर्वक आजअखेर प्रयत्न केले गेले. गोकुळमुळे दूध उत्पादकांचे हित साधले का ? याचे उत्तर काही अंशी होकारार्थी असले, तरी खरे हित संचालकांचेच साधले हे त्रिवार सत्य आहे. दूध म्हणजे अमृत आहे. त्याच्या प्रत्येक थेंबापासून आणि उप- पदार्थापासून पैसा मिळतो. अगदी वासावर काढल्या जाणाऱ्या दुधापासून पैसा मिळतो.

‘एक वेळ आमदारकी नको पण, गोकुळचा संचालक करा’ असे म्हटले जाते. हे वाक्यही वारंवार उच्चारून बोथट झाले आहे. त्याच्याही पलीकडे संचालकांना लोणी खायला मिळते. त्यामुळे ‘गोकुळ’भोवती काही विशिष्ट घराण्यातील लोकांनीच कायमस्वरूपी ‘आळं’ करून ठेवलं आहे. वर्षोनुवर्षे हीच मंडळी गोकुळवर ताबा ठेवूनही आहेत. एक – एक जण ३०-३० वर्षे संचालक आहे. ‘ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात’  अशी एक जुनी म्हण आहे. त्याप्रमाणे आता शारीरिकदृष्ट्या झेपतच नसल्याने आपल्या वारसांना संचालक करण्याचा घाट घातला आहे. ज्याला दूध धंद्यातील ‘ओ का ठो’ माहीत नाही त्यालाही संचालक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

नाही म्हणायला लोकांच्या डोळ्यात येऊ लागल्यानेच कायद्यात बदल करून अध्यक्षपदावर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली. अर्थात, ही चक्क धूळफेक आहे. संचालकांच्या हिताला कोणतीही बाधा येत नाही. जिल्ह्यातील अनेक नेते असे आहेत की ज्यांना सगळंच आपल्या हातात असायला हवं. सगळी मोक्याची पदं आपल्याच घरात हवीत. एकही संचालक सलग तासभर ठिय्या मारून प्रत्यक्ष दूध काढू शकत नाही किंवा दुभत्या जनावरांची देखभाल करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरीही गोकुळच्या सत्तेसाठी रात्रीचा दिवस आणि जिवाचा आटापिटा केला जात आहे. तोही ‘गोकुळ’च्या माध्यमातून मिळवलेल्या पैशाच्या जीवावर. त्या बाबतीत ‘एकाला झाकावा आणि दुसऱ्याला बाहेर काढावा’, अशीच अवस्था आहे. राजकीय वर्चस्व, सत्ता आणि आर्थिक लाभ यामुळे ही हाव सुटता सुटत नाही.

हजारो दूध उत्पादक महिला / पुरुष थंडी, पाऊस, ऊन काही असो, पहाटे उठून शेण – घाण काढून धार काढून वेळेत दूध घालतात. त्यांच्या जिवावर मोठा झालेल्या ‘गोकुळ’ नामक कुबेराच्या खजिन्यावर, तो लुटण्यासाठी यांच्या उड्या पडताहेत. शेण – घाण उत्पादकांच्या घरात आणि दूध, तूप, लोणी संचालकांच्या घरात अशी अवस्था आहे. दूध उत्पादक महिलांच्या श्रमाची कदर करून ‘गोकुळ’भोवती ‘आळं’ करून बसलेल्यांनी खऱ्या अर्थाने त्या मायमाऊलींच्या खऱ्या विकासासाठी प्रयत्न करावेत. कधी तरी त्यांनाही सत्तेची ऊब मिळावी, यासाठी पायउतार व्हावं. आणि त्यांच्या हातात सत्तेची सूत्रं देण्याची इच्छा होईल तो ‘सुदिन’ ठरेल…

*ठसकेबाज*