कोल्हापुरी ठसका : ‘मास्तर’ वारंवार का बिथरतात ?

0
518

महापालिकेच्या राजकारणात प्रत्येक पक्षाचे नेते महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. कार्यकर्त्यांची आणि पक्षाची ताकद मागे असेल तर निवडणूक सोपी जाते. आर्थिक बळही मिळते. महापालिकेवर आपले वर्चस्व असावे, असे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न असतो. त्याला विधान परिषदेसह अनेक कारणे असतात.  नेते सर्वज्ञानी असत नाहीत. ग्राउंड लेव्हलला त्यांनाही कुणाची तरी मदत घ्यावीच लागते. असे पडद्यामागे काम करणारे काही ‘बेरके’ कार्यकर्ते असतात. नेत्यांच्या अगदी निकट असतात. महादेवाच्या मंदिरात प्रवेश करताना अगोदर जसे नंदीला पाया पडावे लागते तसेच मुख्य नेत्यांपर्यंत पोहचण्यासाठी या पडद्यामागच्या कार्यकर्त्याच्या हातापाया पडावे लागते.

असे काही पारंपरिक नेते आहेत. थेट सभागृहात जाता आले नाही तरी मागच्या दरवाजाने म्हणजेच स्वीकृत म्हणून हे सभागृहात पोहचतात. उच्चशिक्षित असल्याने त्यांनी महापालिकेच्या कायद्याचे ज्ञान बऱ्यापैकी आत्मसात केले आहे. नेत्यांना कायद्यातील बारकावे समजावून सांगण्यात पटाईत असतात. नेते आपल्या शब्दाबाहेर नाहीत असा रुबाबही ते मारतात. त्यामुळे नेत्यांना काहीवेळा नाकापेक्षा मोतीच जड होतो…

महापालिकेच्या राजकारणात असे पाच- सहा जण आहेत. जागा शोधायच्या, वटमुखत्यार व्हायचे आणि मोठा ‘आंबा’ पाडायचा किंवा अन्य काही तरी उलाढाल करून मोठा ढपला पाडायचा हाच यांचा प्रमुख धंदा आहे. असेच एक मास्तर जे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या राजकारणात आहेत. ‘कारभारी’ म्हणून मिरवतात. पण, निवडणुकीवेळी ते कोणत्या नेत्यासाठी काम करणार याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. सोयीचं आणि फायद्याचं राजकारण कसं करायचं एवढेच त्यांना माहीत आहे.

काही वर्षे ‘आप्पां’बरोबर राहिल्यानंतर हे मास्तर केवळ उलटलेच नाहीत तर विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी नेत्यांविरुद्धच शड्डू ठोकला. पण, गुरुपेक्षा चेला कधीच मोठा होऊ शकत नाही, याप्रमाणे त्यांना धोबीपछाड मिळाली. गत निवडणुकीत त्यांंनी नेता बदलला. मागील पाच वर्षात सत्ताधारी नेत्यांकडे महापालिकेतील घडामोडीची इत्थंभूत माहिती पुरवणारी स्वतःची यंत्रणा होती. त्यामुळे या ‘कारभाऱ्याला’ या काळात फारसे ‘काम’ नव्हते किंवा महत्त्व मिळाले नाही. म्हणून आता या निवडणुकीत सत्ताधारी नेत्यांची साथ सोडून विरोधी गटाचा ‘कारभारी’ होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. विधान परिषदेचे आमदार करण्याचे स्वप्न कदाचित त्यांना दाखवलं असावं. 

खरं खोटं देव जाणे, पण दोन मंत्र्याची साथ सोडून त्यांनी विरोधकांचा कारभारी किंवा पडद्यामागचा सूत्रधार होण्याचे ठरवल्याचे दिसते. काहीही असले तरी मास्तर असे का बिथरलेत, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित…

ठसकेबाज