कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मुदतपूर्व बदलीसाठी कुणीतरी गुपचुप प्रयत्न करत असल्याची कुणकुण शहरवासीयांना लागली आहे. या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची लोकप्रियता कुणाला तरी खुपते आहे. त्यांच्या बदलीत कुणाचा इंटरेस्ट आहे हे सध्या तरी गुलदस्त्यात असले, तरी आज ना उद्या ते उघड होणार आहे.

दीड वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी देसाई यांची कोल्हापूरला बदली झाली. ते मूळचे याच जिल्ह्यातील असल्याने त्यांना इथल्या प्रश्नांची चांगली जाण आहे. इथल्या गोरगरीब शेतकरी, कष्टकरी जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांना माहीत आहेत. त्यामुळे आपल्या अधिकारात जे जे करणे शक्य आहे ते करण्याचे धाडस त्यांनी केले. त्यांची लोकप्रियता वाढली. ‘चांगले जिल्हाधिकारी’ अशी प्रतिमा निर्माण झाली. इथेच घोडं पेंड खाऊ लागलं.  त्यांची लोकप्रियता पाहून कुणाच्या तरी पोटात पोटशूळ उठला असावा…

महसूल विभाग म्हणजे वर्षानुवर्षे भिजत पडलेल्या त्रांगड्यांचं आगर. संपूर्ण जिल्ह्याचा कारभार इथून चालतो. कामासाठी किती हेलपाटे मारावे लागतात याला गणतीच नाही. जिल्हाधिकारी देसाई यांनी ही त्रांगडी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. चंदगड तालुक्यातील हेरे इथल्या जमिनींचा प्रश्न, गुंठेवारीचा प्रश्न, प्रकल्पग्रस्त पुनवर्सन, पंचगंगा प्रदूषण असे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी केवळ हालचाली केल्या नाहीत तर ते प्रत्यक्षात सोडवले,  मार्गी लावले. अन्यथा, हे प्रश्न सुटायला किती वर्षे लागली असती कोण जाणे. एकेक निर्णय घेऊन त्यांनी षटकार मारले. त्यांची वाढलेली लोकप्रियताच त्यांना अडचणीची ठरली.

महसूल खात्याकडील कामे मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य लोकांना हेलपाटे मारावे लागत होतेच, शिवाय चिरीमिरीही द्यावी लागायची, एजंट गाठायला लागायचा. किरकोळ कामासाठी राजकीय नेत्यांच्या हातापाया पडायला लागायचं. हे सगळंच देसाई यांच्यामुळे थांबलं. अनेकांचा उत्पन्नाचा स्रोतच आटला. कदाचित, त्यांच्याच पोटात पोटशूळ उठला असावा. त्यांनीच कुणाला तरी हाताला धरून बदलीसाठी प्रयत्न सुरू केले असावेत, अशी शंका आहे.

कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. इथे चांगल्याला चांगले म्हणण्याची त्याला डोक्यावर घेण्याची आणि उद्धटाला ‘कोल्हापुरी’चा प्रसाद देण्याची तयारी असते. कुणाचे आर्थिक किंवा इतर हितसंबंध बिघडले असतील, त्यामुळेच देसाई यांच्या बदलीचे प्रयत्न सुरू झाले असावेत. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी देसाई यांनी अक्षरशः सायकलींवरून येऊन काम केले. स्वतःचा बचाव न करता काम केले. सीपीआर प्रशासनापेक्षाही त्यांची कामगिरी अजोड अशीच होती.

महापालिकेचे आयुक्त यांनीही शहर स्वच्छतेची मोहीम उघडली. पारदर्शी कारभार केला. त्यांची ही लोकप्रियता वाढली. कुणाच्या तरी पोटात दुखलं. कुणालाही थांगपत्ता न लागू देता त्यांची बदली केली. तीही मुदतपूर्व. आयुक्त कलशेट्टी, जिल्हा पोलीसप्रमुख अभिनव देशमुख आणि जिल्हाधिकारी देसाई यांच्यात सुसंवाद होता. त्यांच्या लोकप्रियतेचा कुणाला तरी पोटशूळ उठत होता. त्यामुळे या तिघांची युती तोडायचा प्रयत्न केला. आता जिल्हाधिकारी देसाई यांच्या बदलीचा प्रयत्न सुरू झाला. तो हाणून पाडायलाच हवा.

जिल्हाधिकारी देसाई यांच्या बदलीची कुणकुण लागल्यानंतर नागरी कृती समितीने या बदलीला विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तो योग्यच आहे. कुणाच्या तरी हितसंबंधांना बाधा येते म्हणून जिल्हाधिकारी देसाई यांची बदली झाली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी हवी. ‘म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये’. काही काळ जाऊ दे, नेमकं कोणाचा पोटशूळ उठला आहे. त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कोल्हापुरी पद्धतीने ‘उपचार’ करू…

ठसकेबाज