राजकारण्यांना सत्तेचा मोह काही केल्या सुटत नाही. हातात आलेली सत्ता माझ्याकडेच कशी राहील यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू असतो.  त्याला देशातला कुठल्याच पक्षाचा नेता अपवाद नाहीये. आता कोल्हापुरात आजी-माजी आमदारांमध्ये एकमेकांविरुद्ध सुरू असलेलं कुरघोड्यांचं राजकारण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

‘ज्याच्या हातात ससा तो पारधी’ अशी म्हण आहे. त्याची आत्ता आठवण यायचे कारण म्हणजे सध्या राज्यात महाआघाडीचं सरकार सत्तेवर आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहेत. मुख्यमंत्री पद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. अन्य दोन पक्षांपेक्षा सेना जरा वरचढ आहे. म्हणजे त्यांच्या हातात ससा आहे. कोल्हापूर शहरात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या हातात ‘सत्तेचा ससा’ आहे.

क्षीरसागर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत आणि या पदाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. त्यामुळे तेही कार्यरत आहेत. मात्र, दोघांपैकी नेमका पारधी कोण, हेच कुणाला समजेनासे झाले आहे. त्यामुळेच दोघेही एकमेकांविरोधात कुरघोड्या करताना दिसतात. तशा काही घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन मंडळाची (डीपीडीसी) बैठक नुकतीच झाली. या बैठकीस आजी – माजी आमदार दोघेही उपस्थित होते. क्षीरसागर यांची उपस्थिती विद्यमान आमदारांना चांगलीच खटकली. त्यांनी उपस्थित राहून विकास निधी मागितल्याने विद्यमान आमदारांची सटकली. क्षीरसागर यांना डीपीडीसीच्या बैठकीचे निमंत्रण होते की नाही हे माहीत नाही. पण, त्यांच्या उपस्थितीमुळे हैराण झालेल्या काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे काम हा प्रश्न विचारला. त्यांना विकास निधी कसा देता येईल, असा मुद्दाही उपस्थित करून आक्षेप घेतला.

एका माजी आमदारांना विकासनिधी दिला तर सर्वच माजी आमदारांना विकास निधी द्यावा लागेल असेही आमदार जाधव यांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर ते जर राज्यस्तरीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले असतील तर फक्त कोल्हापूरच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीलाच का उपस्थित राहिले ? त्यांनी सर्वच जिल्ह्यातील नियोजन मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहावे, असे सूचित करत त्यांना तो अधिकार आहे का, हेही त्यांनी तपासून पाहावे, असा टोलाही लगावला. आमदारांनी कळीचा मुद्दा उपस्थित केल्याने जिल्हा प्रशासनही गडबडले. अखेर पालकमंत्र्यांनी याबाबत माहिती घेऊन पुढील दिशा ठरवू, असे सांगत या प्रकरणावर पडदा टाकला.

पण, दोघांच्या हातात ‘ससा’ असल्याने नेमका पारधी कोण, याचा शोध कोल्हापूरकर घेत आहेत. उत्तर सापडेपर्यंत नुसतं पाहात राहणं, हेच आपल्या हाती आहे.

ठसकेबाज