आपला पारंपरिक होळीचा सण अजून तीन आठवड्यांवर आहे आणि महापालिकेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार हे अद्याप स्पष्ट नाही. पण, कोल्हापुरात राजकीय शिमग्याला सुरुवात झाली आहे. तो आता यापुढे काही महिने तरी सुरू राहणार आहे. अर्थात, असा राजकीय शिमगा कोल्हापूरवासीयांना नवीन नाही. राज्य पातळीपासून स्थानिक पातळीवरच्या नेत्यांमध्ये तो तसा नेहमीच सुरू असतो.

वास्तविक पारंपारिक शिमगा वर्षातून एकदा येतो. तो घरोघरी तसाच सार्वजनिक स्तरावर साजरा केला जातो. जे काही चुकीचे आहे, वाईट आहे, ते जाऊन आयुष्यात काही तरी चांगलं घडावं यासाठी शिमगा साजरा केला जातो. अलीकडे प्रदूषण टाळण्यासाठी होळीचा आकार कमी होतो आहे. त्यामुळे भविष्यात तो कमी कमी होत जाणार हे नक्की आहे. पण, राजकीय शिमग्याला कधीच कालमर्यादा नाही. त्यामुळे तो सातत्याने सुरू असतो. त्यात प्रामुख्याने राजकीय नेत्यांचा सहभाग असतो. सर्वसामान्य जनता ही केवळ प्रेक्षक असते.  त्यांचा थेट सहभाग नसतो. नेत्यांच्या समर्थकांचा काही अंशी सहभाग असतो. राजकीय शिमग्याकडे केवळ करमणूक म्हणून पाहिले जाते. या शिमग्याला प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, कॅमेरा अत्यावश्यक असतो. या बातम्यांना वाचक आणि दर्शक मात्र खूप असतो.

शनिवारपासून कोल्हापुरात राजकीय शिमग्याला सुरुवात झाली. गोकुळ, महापालिका आणि जिल्हा बँकेसह अन्य निवडणुका निमित्त ठरल्या आहेत. जिल्ह्यातील दोन राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये ‘शिमगा’ सुरू झाला आहे. पक्षापेक्षाही वैयक्तिक दुष्मनीच प्रमुख कारण आहे. त्याला वर्चस्ववादाची किनारही आहे. सत्तासुंदरी नेहमीच आपल्याच ताब्यात असावी, या महत्त्वाकांक्षेपोटी हा शिमगा सुरू झाला आहे.

माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन शिमग्याची सुरुवात केली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर दहा कोटींचा घरफाळा चुकवल्याच्या आरोपासह अन्य अनेक आरोप केले. अवघ्या काही तासातच पालकमंत्री पाटील यांच्या समर्थकांनी स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाडिक यांच्यावर आदर्श भीमा वस्त्रम, पार्किंगमधील गाळे, घुसखोरी, राजाराम आणि भीमा साखर कारखान्याचे थकीत उसबिले आदी आरोप करून प्रती शिमगा साजरा केला.

सत्तासुंदरीची हाव सुटत नाही. काही अपवाद वगळता ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ या न्यायाने प्रत्येक राजकारणी व्यवहार करत असतो. सेवेतून मेवा हाच त्यांचा हेतू असतो. कोणत्याही संस्थेच्या कारभारात प्रत्यक्ष हस्तक्षेप न करता अनेक बाबतीत लाभ उठवता येतो, हे गमक त्यांना उमगलेले असते. त्यामुळेच वर्षानुवर्षे सत्तासुंदरी आपल्या घरातच रहावी यासाठी खटाटोप सुरू असतो. त्यासाठी राजकीय शिमग्याचा घाट घातला जातो. तो करीत असताना स्वतःचे घर काचेचे आहे, हे पद्धतशीरपणे विसरून शिमगा केला जातो. नेत्यांपेक्षा त्यांच्या समर्थकांचीच बोलती जास्त असते. आपल्या दिव्याखाली अंधार आहे याचे भानच या बगलबच्च्यांना राहात नाही. त्यांचाच तोरा जास्त चालतो.

समाजसेवेचा बुरखा पांघरून राजकारणात यायचे आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता काबीज करायची हेच धोरण अवलंबले जाते. त्याला कुणीही अपवाद असत नाही. समाजसेवेच्या बुरख्यामागचा खरा चेहरा सर्व सामान्य माणसाला कधीच कळत नाही. तो केवळ जगायचं कसं याच विचारात असतो. आपल्या हक्कांवर गदा आणून आपली लूट होते आहे हेच त्याच्या लक्षात येत नाही. अजूनही सर्वसामान्य माणूस शांत आहे.

शिमगा कुणासाठी करता हे कुणी सांगायची गरज नाही.

राजकीय शिमगा करणाऱ्यांना खरोखरच सामान्यांबद्दल चाड आहे का ?  स्वार्थासाठी त्यांचा विश्वासघात करून सत्तेची पोळी भाजून घेतली जात आहे. पदरमोड करून समाजसेवा किती केली आणि लुबाडून मिळवलेल्या पैशातून किती केली याचा विचार हे लोक कधी तरी करतील का, हाच खरा प्रश्न आहे. राजकीय शिमग्याचा नेमका अर्थ लावून सामान्यांनीही आता शहाणं होण्याची गरज आहे. अन्यथा असे राजकीय शिमगे होत राहतील आणि आपण मात्र त्याकडे करमणूक म्हणून पहात बसलो तर, अशा लोकांचेच फावणार आहे.

ठसकेबाज