कोल्हापुरी ठसका : शिवसेना अडकली गृहकलहात

0
330

कोल्हापूर महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांच्या हयातीत ते पूर्ण झाले नाही. त्यांच्यानंतरही शिवसैनिकांना अद्याप महापालिकेवर भगवा फडकवता आलेला नाही. मागील अनेक वर्षांपासून शहर आणि जिल्ह्यातील शिवसेना गृहकलहात अडकली आहे. त्यामुळेच शिवसेना भगवा फडकवू शकलेली नाही.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात शिवसेनेची पाळेमुळे भक्कमपणे रुजली. मधल्या काळात शिवसेनेत बऱ्याच घडामोडी झाल्या. पण, शिवसेनेची ताकद वाढत राहिली. त्याला कारणीभूत कोणी पदाधिकारी नाही, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवसैनिकांचे मनापासून असलेले प्रेम कारणीभूत होते. पहिल्यापासूनच शिवसेना कधीच एकसंध नव्हती व आजही नाही. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. गटबाजीची ही कीड आजपर्यंत सेनेच्या एकाही नेत्याला संपवता आलेली नाही.

काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून शिवसेनेने आपले स्थान निर्माण केले. वीस वर्षांत शहरातून तीन आमदार विधानसभेत पाठवले. मागील विधानसभा निवडणुकीत तर जिल्ह्यातून सेनेचे सहा आमदार निवडून आले होते. विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी सेनेला ताकद दिली. पण, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी सेनेला डावलले. अंतर्गत कलह, गटबाजी हेच त्यांचे प्रमुख कारण आहे.

महापालिकेच्या निवडणुकीवेळी राज्य पातळीवरून कोणी तरी निरीक्षक येतात. सेनेतील आता सर्व गटबाजी संपली आहे. निवडणुकीत एकदिलाने काम करतील, असे सांगितले जाते. पण, त्यांची पाठ फिरली की सर्वांची तोंडे एकमेकांच्या विरुद्ध होतात. शिवसेनेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना केवळ राबवून घेतले जाते. ऐन निवडणुकीत त्यांना डावलून उपऱ्यालाच उमेदवारी दिली जाते असा आजवरचा अनुभव आहे. कार्यकर्त्यांना नाराजीही व्यक्त करता येत नाही. सेनेत पक्षांर्गत लोकशाही नाही. एकखांबी तंबू असल्याने संपर्कप्रमुखांच्या पुढे मुख्य नेत्यांपर्यंत तळागाळातील कार्यकर्त्यांची खदखद कधीच पोहोचत नाही. शिवसेनेचा आक्रमकपणा तरुणांना भावतो. मात्र त्यांना न्याय मिळत नाही. खंडेनवमीच्या शस्त्रांप्रमाणे कार्यकर्त्यांचा वापर केला जातो. निष्ठावंतांना न्याय कधीच मिळत नाही.

भल्याभल्यांनी प्रयत्न करूनही अंतर्गत गटबाजी न संपण्यामागे नेतेच कारणीभूत आहेत. एकजिनसीपणा आला की त्यांच्यावर दबाव टाकणे शक्य नसते. त्यामुळे गटबाजी कायम रहावी असेच त्यांना आतून वाटत असते. कानाला लागून बऱ्याच गोष्टी आपोआप कळतात, हे नेते ओळखून आहेत.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आहे. त्याचा फायदा घेता येणे शक्य आहे. महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे असणार आहे. आतापर्यंत एखादा अपवाद वगळता महापालिका निवडणुकीत सेनेला दोन अंकी सदस्य संख्या निवडून आणता आलेली नाही. यावेळी सेनेच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार हे पहावे लागणार आहे. आघाडीत त्याबाबतीत बेबनाव होण्याची शक्यता अधिक आहे. कमी जागा मिळाल्या तर त्यापैकी किती जागा जिंकणार आणि शिवसेनेची सभागृहातील अवस्था कशी असणार हे लवकरच कळेल.

भाजपाबरोबरची युती तोडल्यानंतर भाजपची मते मिळणं बंद झाले आहे. शिवाय शिवसेनेला मतदान देणाऱ्यांपैकी मतदार युती संपल्याने वेगळा विचार करण्याची शक्यता अधिक आहे.

एकूणच अंतर्गत गृहकलहाचे ग्रहण संपले तरच काही जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा बॅकफूटवर जाण्याची नामुष्की पदरात पडण्याचीच शक्यता आहे. परिणामी, महापालिकेवर भगवा फडकवण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न तसेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते ही निवडणूक किती गांभिर्याने घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.