कोल्हापुरी ठसका : राजकारणी आणि पत्रकार म्हणजे ‘सख्खे शेजारी…

0
203

‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. त्यानिमित्त आज पत्रकार दिन साजरा केला जातो.  आचार्य जांभेकर यांच्यावेळेची पत्रकारिता एका ध्येयाने प्रेरित होती. मात्र, आजच्या पत्रकारितेला बाजारूपणाची लागण झाली आहे. राजकारणी आणि पत्रकार म्हणजे ‘सख्खे शेजारी’ बनले आहेत. पत्रकार विकाऊ, भाट, झाल्याचा थेट आरोप सर्वसामान्य वाचक करू लागले आहेत.

पूर्वी पत्रकार आणि राजकारणी एकमेकांशी परिचित नव्हते असे नाही. पण,  दोघेही आपल्या विचारांशी एकनिष्ठ होते. कामात हस्तक्षेप करत नव्हते. आता अपवाद वगळता बहुतांश पत्रकार राजकारण्यांशी एकनिष्ठ बनले आहेत. पत्रकार म्हणजे समाजसेवक, समाजाचा वाटाड्या, शिक्षक, अन्यायाविरुद्ध लढणारा, श्रमणाऱ्या, कष्टकऱ्यांची, दु:खितांची बाजू घेणारा संवेदनशील माणूस असावा अशी अपेक्षा असते.

आजचे राजकारणी बनेल आणि बेरकी आहेत. कोणत्या पत्रकाराला जवळ करायचे आणि कुणाला चार हात लांब ठेवायचे हे त्यांना पक्के माहीत असणारे आहेत. कुणाजवळ काय बोलले म्हणजे, काय छापून येणार याची जाण त्यांना असते. बहुतेक राजकारणी आपल्या भाषणात ‘पत्रकार बंधू’ असा उल्लेख करतात. पण, प्रत्यक्षात व्यवहार मात्र पूतना मावशीसारखा असतो.

विरोधकांच्या विरोधात लिहिले की सत्ताधारी खूष आणि त्यांच्याविरुद्ध लिहिले की अतिशय नाराज होतात.  पत्रकार नि:स्वार्थी, निष्पक्ष निर्भीड असावा, असे सर्वानाच वाटते. पण, त्याने आपल्या विरोधात न लिहिता किंवा छापता चांगले तेवढेच लिहावे, छापावे यासाठी राजकारणी आग्रही असतात. सध्या ध्येयवादी पत्रकारितेला कुठेच संधी नाही. पत्रकार हा नोकर नव्हे तर, राजकारणी आणि भांडवलदारांचा गुलाम झाला आहे. त्याची कशी कोंडी करायची हे त्यांना चांगलेच माहीत आहे. पत्रकाराला जे काही लिहायचे आहे, ते लिहिताच येत नाही. केवळ पोटभरू म्हणूनच काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

पक्के राजकारणी थेट बातमीच डिक्टेट करतात. बातमीचे हेडिंग काय असावे, चौकटी काय असाव्यात, इतकेच नाही तर कोणत्या पानावर, किती कॉलममध्ये बातमी असावी हेही सांगतात. पत्रकार परिषदेत एखाद्या पत्रकाराने अडचणीत आणणारा प्रश्न विचारलाच तर त्याकडे हसत हसत दुर्लक्ष करायचे आणि नंतर त्यांना त्याच्या साथीदाराकडून अप्रत्यक्षरीत्या समज देणारेही काही राजकारणी आहेत. निर्भीडपणे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराशेजारी आपला माणूस उभा करून त्याला प्रश्नच विचारण्याची संधी मिळू दिली जात नाही, असेही काही राजकारणी आहेत.

आचार्य जांभेकर यांची बुद्धिमत्ता, वाचन, भाषा ज्ञान, आकलन शक्ती, संवेदनशील मन, लेखनशैली असणारा पत्रकार सध्या आढळणे महामुश्किल आहे. याउलट राजकारण्यांशी जुळवून घेऊन पत्रकारिता करणारे विपुल प्रमाणात मिळतील. अर्थात, त्याला समाजही काही अंशी जबाबदार आहे. निर्भीड पत्रकारांच्या मागे समाज उभा राहत नाही. पत्रकार आणि राजकारणी यांच्यात सख्य जरूर असावे, पण ते ‘सख्खे शेजारी’ असू नयेत. चुकीला चूक म्हणण्याचे धाडस पत्रकारामध्ये असायला हवे. अन्यथा, कुणाचेच हित साधणार नाही.

ठसकेबाज