कोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..!

0
5408

कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत गव्यांचा वावर असल्याचं स्पष्ट झाले. असं का व्हावं, असा प्रश्न प्रत्येकाला पडला. उत्तरही अगदी सोपं आहे. माणसांचा अति स्वार्थ त्याला कारणीभूत आहे, हे मान्य करावेच लागेल. निसर्गाच्या सान्निध्यात राहणे वेगळे आणि अतिक्रमण करणे वेगळे… पूर्वी वानप्रस्थाश्रम व्यवस्थेत वयोवृद्ध जंगलात जात असत. आता कुणीही उठतो, जंगलात जातो आणि तिथे अतिक्रमण करतो. आपण जंगली प्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण करतो आहोत याचं भान माणसाला राहिलेले नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुके हे डोंगरी तालुके आहेत. या भागात प्रचंड जैवविविधता होती. आजची स्थिती पाहिली की निसर्गावर घाव घालून तिथे मानवी वस्ती झाल्याचे दिसते. निसर्गाला कोणाचीही ढवळाढवळ चालत नाही. पूर्वी जंगलात सहसा कोणी जात नव्हते. आता पर्यटनाच्या नावाखाली माणसं सर्रास जाऊ लागली आहेत. आपल्याबरोबर नको त्या गोष्टीही सोबत घेऊन जातात. मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राण्यांना त्रास होऊ लागला आहे. त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला. त्यांचं जगणंच मुश्किल झाले आहे. पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, चंदगड, भुदरगड, आजरा या तालुक्यांवर दृष्टिक्षेप टाकला तर नेमकी वस्तुस्थिती लक्षात येईल.

जंगलात काही ठिकाणी प्लॉट पाडले आहेत. अनेकांनी फार्म हाऊस बांधली आहेत. रिसॉर्ट उभारली आहेत. स्टार दर्जाची हॉटेल्स झाली आहेत. पूर्वी जंगलात शांतता नांदत होती. आता मात्र त्या शांततेला माणसाच्या अतिक्रमणामुळे नख लागले आहे. वास्तविक, माणसांनी अतिक्रमण करताना त्यांना संबंधित खात्यांनी परवानगी कशी दिली याची चौकशी व्हायला हवी. परवानगी देणारे आणि घेणारे कोण आहेत हे शोधायला हवे. त्याचबरोबर यामध्ये अधिकाऱ्यांनी किती कमाई केली हे सर्व कळायला हवे.

जंगलात रात्री रातकिड्यांची किरकिर, कोल्ह्यांची कोल्हेकुई, अधून मधून घुबडाचा आवाज ऐकू यायचा. रात्रीच्यावेळी जंगलात जायचे झाले तरी अंगावर शहारे यायचे. आता विद्युत रोषणाईचा झगमगाट दिसतो. या प्रकाशाला प्राणी घाबरून जातात. आवाजाच्या दणदणाटाने ते बिथरतात. त्याला शांततेत जगता येईनासं झालंय. त्यांच्या जीवनाची, मुक्त संचाराची सगळी घडीच माणसाने विस्कळीत करून टाकलीय. त्याशिवाय प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, दारूच्या रिकाम्या बाटल्या जंगलभर पडल्याचे दिसते. त्यामुळेही प्राण्यांना त्रास होतो आहे, याची जाणीवच माणसाला नाही.

माणसाने आता तरी सुधारायला हवे. स्वार्थ कमी करायला हवा. जंगलातील हस्तक्षेप रोखायला हवा. त्यासाठी गरज पडली तर कठोर कायदे करायला हवेत. अन्यथा, एक दिवस गवे, बिबटे, लांडगे, कोल्हे तुमच्या गल्ली-बोळातून फिरायला लागतील, तेव्हा माणसाला कायमस्वरूपी जंगलात जावे लागेल. निसर्गातील हस्तक्षेपामुळे वातावरणात अनिष्ट बदल होऊन आपलेच अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती आहे.

ठसकेबाज