कोल्हापुरी ठसका : पन्हाळ्याला अस्मानी संकटाचा वेढा….!

0
549

पन्हाळगडाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच मंगळवार पेठ येथे आज मोठ्या प्रमाणावर भुस्खलन होऊन गडाची मोठी हानी झाली आहे. खालच्या भागात असलेल्या गावात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. प्रथम दर्शनी मुसळधार पाऊस त्याला कारणीभूत असला तरी स्वार्थी मानवी हव्यासाचा फटका त्याला कारणीभूत आहे लक्षात घ्यायला हवे.

शेकडो वर्षे थंडी, ऊन, पावसाच्या तडाख्यात कणखरपणे उभ्या असलेल्या पन्हाळा गडाने असल्या अस्मानी संकटाला कधीच दाद दिली नाही. इतक्या वर्षांनंतरही तो शिवशाहीचे स्मरण करून देत डौलाने उभा आहे.

गडाला कोणतेही संकट नवीन नाही. मग ते अस्मानी असो वा सुलतानी. छत्रपती शिवाजी महाराज यांना पकडण्यासाठी, त्यांना जेरीस आणण्यासाठी सिद्धी जोहारने गडाला वेढा घातला. गडाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे संकट होते. छत्रपती गनिमी काव्याने पावन खिंडीतून सिद्दीला चकवा दिला. या संकतातही गडाचा एकही दगड खिळखिळा झाला नाही. साधा ओरखंडाही पडला नाही.

गेल्या दोन तीन दिवसात मुसळधार पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडवला आहे. गेल्या साठ सत्तर वर्षात इतक्या कमी कालावधीत एवढा पाऊस झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. या असल्या संकटाने गडाला हानी होणे शक्य नाही. भुस्खलन होण्यासाठी गेल्या काही वर्षात स्वार्थी माणसाचा हावरेपणा कारणीभूत आहे असे म्हणणे नक्कीच चुकीचे होणार नाही. स्वार्थी माणसांनीच पन्हाळा गडाला अडचणीत आणले आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याची आपली मानसिकताच नाही हेच सत्य आहे. उलट असा समृद्ध वारसा उध्वस्त कसा होईल याकडेच लक्ष दिले गेले. भ्रष्टाचाराची कीड लागली. पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष अशा अनेक कारणांनी गड खिळखिळा झाला. जराजर्जर झाला.

पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर असलेली वृक्ष संपदा तोडून टाकली. गुंठाभर जमिनीसाठी पायथा पोखरला. पायाच ढिसाळ करून लाखो रुपये खर्च करून लोकांनी फार्म हाऊस, बंगले बांधले. त्यासाठी गडाच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या कायदे, नियमांना पायदळी तुडवले. स्वार्थ साधला. आज दुर्धर अवस्थेतील गडाने पावसाच्या माऱ्यापुढं हार मानली. हा दोष गडाच्या भक्कमतेचा नाही, तर माणसाच्या स्वार्थीपणाचा दोष आहे. अशा कृत्यांना, बांधकामांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांचा दोष आहे.

सुदैवाने जीवित वा वित्त हानी झाली नाही. पण, या संकटाने धोक्याचा इशारा नक्की दिला आहे. अजूनही वेळ गेलेली माणसानं जाग व्हायला हवं. आपल्या स्वार्थाला मुरड घालायला हवी. अशा ऐतिहासिक वारसा स्थळांना जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. गडाभोवतीचा मानवी हस्तक्षेपाचा वेढा कमी करायला हवा. अन्यथा कोणत्याही संकटाला आजपर्यंत दाद न देणारा छत्रपती शिवरायांचा आपला गड नेस्तनाबूत व्हायला वेळ लागणार नाही. दुर्दैवाने तसे झाले तर आपल्या पुढील पिढ्यांना केवळ गडाचे अवशेष पहायची वेळ येईल. डोळ्यात तेल घालून अशा ऐतिहासिक वास्तू जपायला हव्यात. अन्यथा न भरून येणारे नुकसान होण्याची भीती आहे. मानवी हस्तक्षेपाचा वेढा कायमचा हटवण्याची गरज आहे.

ठसकेबाज