काही वर्षांपूर्वी कोल्हापूर शहर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र कालांतराने शिवसेनेचे बस्तान बसले आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला ओहोटी लागली. आगामी निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी राहणार, हे नेत्यांच्या हातात आहे. काँग्रेस म्हणजे सतेज पाटील आणि सतेज पाटील म्हणजे काँग्रेस अशीच अवस्था होण्याची अधिक शक्यता आहे. हे जरी असले, तरी इतर पक्षांची अवस्था पाहता महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व ठळक प्रमाणात दिसून येण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या दृष्टीने आयती संधीच मानली जात आहे.

मागील काही वर्षांत काँग्रेसची घडी विस्कळीत झाली आहे. जिल्ह्याला आणि शहराला सक्षम नेतृत्व मिळाले नाही. काँग्रेस जशी आहे तशी आमदार पी. एन. पाटील यांनी हाताळली. जिल्हाध्यक्ष निवडीवेळी झालेली धक्काबुक्की आणि त्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांची झालेली नियुक्ती आणि कोणी सहकार्य करत नाही, असे सांगत त्यांनी अचानक दिलेला राजीनामा तसेच अनेकांनी काँग्रेसला केलेला रामराम, या घटना सर्वांनाच ज्ञात आहेत.

काँग्रेसला गेल्या काही वर्षांत नवा शहराध्यक्ष निवडता आलेला नाही. विद्यमान शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांचे वय झाले आहे. प्रकृतीमुळे ते पदाला न्याय देऊ शकत नाहीत. नव्या दमाचा, उमदा कर्तृत्ववान शहराध्यक्ष काँग्रेसला निवडता आलेला नाही. काँग्रेस कमिटीत अपवाद वगळता फारशी वर्दळही नसते. जाजमावर बसून सर्वानुमते निर्णय घेण्याची पद्धत इतिहासजमा झाली आहे.

महाआघाडी सरकार अस्तित्वात आल्याने काँग्रेसला सध्या बऱ्यापैकी दिवस आलेत. अर्थात, ही ताकद म्हणजे कुबड्यांचा आधार आहे. स्वकर्तृत्वाचा त्यात काहीच भाग नाही. सध्याचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील हेच काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत. काँग्रेस कमिटीऐवजी ‘अजिंक्यतारा’वरूनच निर्णय घेतले जात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारण्यासाठी त्यांना सर्वच गोष्टी अनुकूल आहेत. फासे बाजूने पडू शकतात अशी स्थिती आहे.

सतेज पाटील सध्या फॉर्मात आहेत. मजबूत आर्थिक परिस्थिती, पुरेसे मनुष्यबळ आणि नियोजनबद्ध काम करण्याची पद्धत या बाबीही जमेच्या आहेत. शिवाय काँग्रेसकडे अनेक अनुभवी सदस्य आहेत. महापालिकेच्या सत्तेच्या जगन्नाथाचा रथ नेमका ओढायचा याच उद्देशाने महापालिकेच्या निवडणुकीचे नियोजन करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

सर्वच बाजूने परिस्थिती अनुकूल असली, आणि काँग्रेसला आयती संधी मिळणार असली तरी सतेज पाटील यांनी केवळ एकहाती निर्णय न घेता सर्वांना बरोबर घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा, नाराजीचा फटका बसू शकतो. शिवाय अनेक कारणांमुळे काँग्रेसविरोधात जनमत आहे. त्यामुळे महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होणार का, हे येणारा काळच सांगेल…

ठसकेबाज