कोल्हापुरी ठसका : राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा योग्य, पण…

0
322

राष्ट्रवादी काँग्रेसला खऱ्या अर्थाने बळ मिळाले ते कोल्हापुरात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एकखांबी तंबूवर उभारलेली सर्कस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. कोल्हापुरात या पक्षाने बऱ्यापैकी ताकद निर्माण केली हे खरं आहे. पण, मंत्री हसन मुश्रीफ वगळता पक्षाचा अन्य कोणीही नेता प्रभावशाली ठरू शकलेला नाही. त्यामुळे सध्या तरी पक्ष मुश्रीफ यांच्या तालावर चालतो. ते म्हणतील तीच पूर्व. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वबळाचा नारा देणे, हे जरी योग्य असले तरी सत्तेत येण्यासाठी इतर पक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे, याची जाण राष्ट्रवादीच्या नेत्यांना नक्कीच असावी. सत्तेत जादा वाटा मिळविण्यासाठी आगामी निवडणुकीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे.  

पवार यांच्या प्रेमापोटी सर्वसामान्य लोक राष्ट्रवादीला भरभरून प्रतिसाद देतात. पण, स्थानिक नेत्यांना वाटते की, आपल्यामुळे पक्ष वाढतोय. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’, अशी एक म्हण आहे. तशीच अवस्था नेत्यांची झाली आहे. पर्यायी सक्षम नेतृत्व मिळत नाही. त्यामुळे पक्षाला सक्षम जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष मिळत नाही. किंबहुना, नव्या चेहऱ्यांना संधीच मिळू दिली जात नाही. ‘सगळं मलाच’ ही नेत्यांची प्रवृत्ती काही झाले तरी संपत नाही. मला नाही तर माझ्या घरातल्या कुणाला तरी काही तरी मिळायलाच हवी ही नेत्यांची भूमिका संपत नाही. मेहुणा – पाव्हण्यातील सुंदोपसुंदी हा त्यातलाच भाग. कार्यकर्ते गोंधळात पडलेच पण, पक्षाची हातची जागा गमवावी लागली. गटबाजी आहेच.

या नेत्यांनी मागील काही वर्षांत सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं केलं असं घडलं नाही. एकही उदाहरण डोळ्यासमोर नाही. ते का घडलं नाही, हे कोणीही विचारत नाही. घराणेशाही हा आमचा हक्क आहे, असाच या नेत्यांचा समज आहे. सत्ता नेहमी आपल्याच घरात नांदली पाहिजे, राहिली पाहिजे या हेतूनेच नेते कार्यरत असतात. मी पक्ष मोठा केला असे एकही नेता छातीठोकपणे सांगू शकणार नाही, हे सत्य आहे. आपले उपद्रवमूल्य दाखवले की यांची मनीषा पूर्ण होते, हे त्यांना चांगलेच माहीत आहे.

कोल्हापूर शहरात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. पक्षाला शहराध्यक्ष म्हणून नवा चेहरा देता आलेला नाही. त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत. विद्यमान शहराध्यक्ष आर. के. पोवार अनुभवी आहेत. पण, त्यांना अनेक बाबतीत मर्यादा आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसबरोबरच जावे लागणार आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी कस लागणार आहे. पक्षाच्या अधिक जागा निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. फक्त आपले बगलबच्चे निवडून आले की झालं, अशी भूमिका घेता कामा नये. सत्तेत सहभागी होता येईल. पण, काँग्रेस, शिवसेना यांच्या कुबड्या घ्याव्याच लागतील.

ठसकेबाज