समाजसेवा विविध प्रकारे करता येते. त्यासाठी हातात सत्ता असायला हवी असे काही नाही. कोणतीही सत्ता हातात काम नसताना अनेकांनी समाजसेवेचे व्रत अंगिकारले आहे. कित्येक वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सत्तेचा कधीच हव्यास केला नाही. ते जास्तीत जास्त एखाद्या पुरस्काराचे मानकरी ठरतात. अपवादात्मक एखाद्याला शासनाकडून अनुदान मिळते. सेवाव्रतींंना लोकाश्रय मात्र चांगला मिळतो, असा अनेकांचा अनुभव आहे. 

राजकारण हे समाजसेवेचे एक माध्यम आहे. या सेवेपोटी त्यांना आर्थिक मोबदला तसेच अन्य सुविधा मिळतात. असे समाजसेवक हा समाजाचा प्रतिनिधी असतो. लोकांचे आणि संस्थेचे हित साधणारा तो विश्वस्त असतो. विश्वस्त जितका प्रामाणिक तितका विकास जास्त होतो. महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. अनेकजणांना आपण समाजसेवक असल्याचा भास होऊ लागला आहे. सहा महिन्यांपूर्वी हे कुठे होते, हे लोकांनाच समजत नाही.

सत्ता असल्याशिवाय समाजसेवा करता येत नाही, असा काही यांचा समज असतो. एकदा का नगरसेवक झाले की हे एका क्षणात यू टर्न घेतात. आपण लोकसेवक आहोत हे विसरतात. तत्पूर्वी निवडून येण्यासाठी एवढे नम्र होतात की बोलायची सोय नाही. पैसाही पाण्यासारखा खर्च करतात. त्यामुळे पेरलेला पैसे विविध मार्गानी दामदुप्पट वसूल करायला सुरुवात करतात. त्यांचा तोराच बदलतो. पोशाख, राहणीमान बदलते. लोक ‘साहेब’ म्हणून संबोधायला सुरुवात करतात. पायी फिरणारे किंवा दुचाकीवरून फिरणाऱ्यांकडे चारचाकी कधी येते हे कळतदेखील नाही. घराची डागडुजी होते किंवा टुमदार घर होते. सोबत दोन-चार कार्यकर्त्यांचा राबता असतो. न मागता मान-सन्मान मिळतो. विविध सुविधा मिळू लागतात.

आरक्षण मिळाल्यापासून अनेक महिलाही नगरसेविका होऊ लागल्या. त्यांचाही तोरा बदलतो. आपण काही तरी स्पेशल आहोत असं त्यांना वाटू लागतं. रोज साध्या साडीवर वावरणारी महिला भारी किमतीच्या साड्या वापरायला लागते. एरवी चालत जाऊन दळपकांडप, भाजी आणणारी महिला कारशिवाय बाहेर पडत नाही. अंगाखांद्यावर पिवळ्या धातूचे वजन वाढू लागते. मानसन्मान वाढतो.

पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्याचा एक सोपा आणि मध्यम मार्ग म्हणून काही जण याकडे पाहतात. शिवाय दोन नंबरवाल्यांकडे भरपूर काळा पैसा असतो. तो निवडणुकीत गुंतवायचा आणि पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळवायचा याच हेतूने रिंगणात उतरतात. आश्चर्य म्हणजे लोकांना त्यांचा उद्योग माहीत असूनही अशांनाच लोक ‘सेवक’ म्हणून विजयी करतात.

एखाद्या संघटनेत किंवा पक्षात कार्यरत होऊन समाजसेवा करण्यास फारसे कुणी उत्सुक असत नाहीत. विश्वस्त म्हणून भूमिका न बजावता आपला हक्कच आहे, अशा आविर्भावात वागू लागतात. अचानक इतका बदल कसा झाला याच गुपित सर्वसामान्य लोकांना कळत नाही. त्यामुळे ते संभ्रमात पडतात. नेता होण्यापूर्वी इतरांना नावे ठेवणारे नेता झाल्यावर त्याच्यासारखे वागू लागतात. पदाची ‘झूल’ पांघरली की माणसं बदलतात, त्यामुळे सर्वांचीच घरे काचेची असतात, असे म्हणावे लागते.

ठसकेबाज