कोल्हापुरी ठसका : कालचा गोंधळ बरा होता असं नको व्हायला…

0
144

महापालिका निवडणूक जाहीर झाली की इच्छुक जनतेपुढे फारच नम्र होतात. इतके की, नम्रतेचे जणू आदर्शच… निकाल लागल्यावर मात्र नम्रतेचा उसना मुखवटा गळून पडतो. अर्थात, अगदी हाताच्या बोटाच्या मोजण्याइतकेच याला अपवाद असतात. सभागृहात आले की त्यांचे वर्तन, भाषा बदलते, असा अनुभव आहे. वास्तविक, मागील काही वर्षांपासून अशी परिस्थिती आहे. किंबहुना आणखीनच बिघडत चालली आहे. सर्वांनी याचा अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.

दर निवडणुकीपूर्वी मतदारसंघात ह्यांव करू, त्यांव करू म्हणणाऱ्यांना स्वतःच्याच घोषणांचा विसर पडतो. पदाधिकारी आणि नगरसेवक महापालिका आणि कर्मचारी आपल्याच मालकीचे असल्याच्या आविर्भावात ते वावरतात. शिक्षित असूनही अशिक्षितांसारखे वागतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर हमरीतुमरीवर येतात. अशा वागण्यामुळे अधिकाऱ्यांचा अपमान केला जातो. अनेक अधिकाऱ्यांनी स्वतःची बदली करून घेतली, काही जणांनी राजीनामे दिले तर अनेकांना ताण सहन न झाल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्याच्या घटना महापालिकेत अनेकवेळा घडताना दिसतात.

महापालिकेने सुरू केलेले उपक्रम बंद करण्याची नामुष्की आली तरी त्याचे कुणालाही सोयरसुतक असत नाही. पाटाकडील तालीम परिसरातील एक नगरसेवक आणि क्रीडा प्रशिक्षक यांच्यातील वादामुळे महापालिकेचा क्रीडा विभागच बंद पडला आहे. संबंधित नगरसेवकाने त्या प्रशिक्षकाची त्याचा संबंध नसलेल्या ठिकाणी बदली केली. त्यामुळे हा विभागच बंद पडला. अनेकदा संघर्षाचे प्रसंग आले. पण, वरिष्ठही कानाडोळा करतात. कर्मचारी संघटनेकडे न्याय मागायला जावे तर अगोदर लेखी तक्रार दे, पोलिसात तक्रार कर असा सल्ला दिला जातो. शिवाय भविष्यात त्रास होईल, अशी भीती घालून गप्प बसवले जाते.

एखाद्या सदस्याविरुद्ध आंदोलन करायचेच झाले तर समोर कोण आहे हे पाहून निर्णय घेतला जातो. अशा वर्तनानंतर त्या संबंधित सदस्यांचे नेतेही काही लक्ष घालत नाहीत किंवा सूचना देत नाहीत. त्यामुळे नेत्याचा आपल्याला पाठिंबा असल्याचा गैरसमज होतो. त्यामुळेही उर्मट वर्तन करणारा सदस्य अधिकच आक्रमक होतो. महापालिकेचा कारभार कायद्याने चालतो. मात्र, आपल्याला सोयीचे होत नाही, असे दिसताच संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्याचा उद्धार केला जातो. कार्यालयाची तोडफोड केली जाते. अनेकवेळा मारहाण केली जाते. बघून घेण्याची धमकी दिली जाते. काही सदस्य इतके गोडबोले असतात की त्यांची कामे  पटापट होत असतात.

महापौर झाल्यावर आपली कारकिर्द वेगळी ठरावी यासाठी काही घोषणा केल्या जातात. ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’, ‘महापौर आपल्या दारी’, अशा घोषणा झाल्या पण, महापौरपदाचा कालावधी संपला तशा घोषणा हवेत विरून गेल्या. आपल्याच गटाच्या कार्यकर्त्याला संधी देण्याच्या नादात ‘महापौर’सारख्या मानाच्या पदाच्या कालावधीची खांडोळी करून एक प्रकारे या पदाची प्रतिष्ठा, शान कमी करण्याचा खेळ नेत्यांनी खेळला आहे. त्यामुळे किमान अडीच वर्षे पदावर राहण्याऐवजी अडीच महिन्यांचा महापौर असे बिरूद मिळविण्याची वेळ अनेकांवर आली. पदावर बसण्याअगोदरच पायउतार होण्याची वेळ येते. याचा ना कुणाला खंत ना खेद…

महापालिकेतर्फे कोल्हापूर भूषण पुरस्कार देण्याची परंपरा खंडित झाली. तीच अवस्था कुस्ती आणि फुटबॉल स्पर्धाची झाली आहे. इतकेच नाही तर शालेय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडले आहेत. केएमटीचा उपक्रम तोट्याचा ठरतो आहे. त्याला बहुतांशी सदस्यच कारणीभूत आहेत हे वास्तव आहे.

एकूणच सभागृहाची शान वाढावी, शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, कोल्हापूरचा नावलौकिक वाढावा, लोकांना चांगल्या सोई- सुविधा मिळाव्यात यासाठी पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांच्यात सुसंवाद ठेवून कारभार करण्याची गरज आहे. लोकांचा प्रतिनिधी, विश्वस्त म्हणून निवडून येणाऱ्या सदस्यांवर अधिक जबाबदारी आहे. याची जाण नव्याने अस्तित्वात येणाऱ्या सभागृहातील सदस्यांना असावी, एवढीच माफक अपेक्षा बाळगण्यात काहीच हरकत नाही. अन्यथा कालचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आल्याशिवाय राहणार नाही.

-ठसकेबाज