कोल्हापुरात ‘अ’ ‘आ’ चा पाऊस हे शीर्षक पाहून तुम्ही बुचकळ्यात पडणार हे मला हमखास माहीत होतं. पण, लगेचच त्याचा खुलासा करतो. म्हणजे डोक्यावर जास्त ताण येणार नाही. मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस होतोय आणि काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला. कालच्या दौऱ्यात कोल्हापुरात त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यांचा ठिकठिकाणी सत्कारही झाला. २०१९ च्या महापुराच्या काळातही त्यांनी शहरवासीयांसाठी चांगली मदत दिली. धडाक्याने काम करण्याचा त्यांचा बाणा आहे.

मंत्रिमंडळातील ते महत्त्वाचे मंत्री आहेत. शिवसेनेत त्यांचे वजन आहे. दोन जबाबदारीची खाती त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे शहराच्यादृष्टीने त्यांचा दौरा महत्वाचा होता यात शंकाच नाही. विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले होते. त्यावेळी एकालाही मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही. कोल्हापूरकर जिंदादिल आहेत. एखाद्यावर त्यांनी प्रेम केलं की केलं त्याला डोक्यावर घ्यायला कमी करत नाहीत. त्याला प्रामाणिकपणे साथ देतात. पण, त्यांना कोणी फसवण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याची खैर नसते.

मंत्रीमहोदयांनी काल महापालिकेला भेट दिली. गडहिंग्लज,  इचलकरंजी,  गारगोटी यांच्याही पदरात आपण भरभरून टाकणार, असे आश्वासन दिले आहे. कोल्हापुरात गेल्या काही वर्षांत तेच तेच प्रश्न,  प्रकल्प, योजना प्रलंबित आहेत. हे प्रश्न एकाच वेळी सोडवणे शक्य नाही. हद्दवाढीचा मुद्दा तितका सरळ नाही. त्याला दोन बाजू आहेत. त्यात राजकारणही आहे. ज्या त्या वेळी योग्य निर्णय घेतले असते तर ही वेळ आली नसती. तरीही हद्दवाढीसाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल. त्यानी फेरप्रस्ताव पाठवण्याची सूचना केली आहे. सध्या महापालिकेवर प्रशासक आहेत. नवे सभागृह अस्तिवात यायला अजून दोन-चार महिन्याचा कालावधी आहे. प्रशासनाला असा प्रस्ताव देता येईल का, हे पहावे लागेल. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची या फेरप्रस्तावाला मान्यता असणे आवश्यक आहे. त्यांची मान्यता सहजासहजी मिळेल का, हे प्रश्न समोर आहेत.

त्यांनी ऐतिहासिक रंकाळा तलाव, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग कुस्ती मैदानाला भेट देऊन तिथल्या कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. महालक्ष्मी विकास आराखडा कामासाठी निधी देण्याचेही आश्वासन दिले आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी गरज असेल तेथे उड्डाण पूल, भुयारी मार्ग करण्याबरोबरच स्काय वॉकसारख्या अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची स्वप्ने दाखवली आहेत. नाही म्हणायला राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ स्मारकासाठी आठ कोटी रुपये देण्याची घोषणा  केली. शाहू मिल येथील स्मारकाचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन त्यांनी अधिकतर आश्वासनांचा पाऊस पाडला. ती अवकाळी पावसासारखी ठरू नयेत, हीच अपेक्षा.

जाता जाता त्यांनी कार्यकर्त्यांना महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीची आठवण करून देत शिवसेनेचे उमेदवार निवडून आणा, असे आवाहन केले. शिवाय शिवसेनेचा महापौर करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन केले. शिवसेना ही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे का ? महाविकास आघाडीचे काय होणार? ते स्वतंत्र लढले तर सेनेचा निभाव लागणार का, असाही प्रश्न आहे. सेनेतील गटबाजीवर मात्र त्यांनी काहीच भाष्य केले नाही. त्यांच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहतानाही गटबाजी दिसून आली. त्यामुळे नेमके कोण काम करणार हेही महत्वाचे आहे.

सारांश काय तर काल शहरात ‘अ’ ‘आ’ चा पाऊस पडला हेच खरे.

ठसकेबाज