कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉनवर उपलब्ध..!

0
35

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशभरात लौकिक असलेली कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. कोल्हापुरात आज (सोमवार) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेबसाईट उघडून हा ऑनलाईन विक्री प्रारंभ झाला. कोल्हापूर जिल्हयामधील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट उत्पादनांना कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी ऑनलाईन प्रॉडक्ट विक्री मोहिमेचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल म्हणाले की, ॲमेझॉन या डिजिटल विक्री बाजारपेठ संकेतस्थळावर महिला स्वयंसहाय्यता गटांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होऊन ग्रामीण भागामध्ये आर्थिक विकासाला चालना देण्याची संकल्पना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विचारातून साकारण्यात येत आहे.

आज जिल्हयातील प्रसिध्द असलेले कोल्हापुरी चप्पल ऑनलाईन लिंकवरून उत्पादन विक्रीसाठी खुले करण्यात आले. कोल्हापूरी गूळ,  काकवी, व्हाईट मेटल ज्वलरी, कोल्हापुरी दागिने, मध, विविध प्रकारचे मसाले, कोल्हापुरी कांदा व लसूण चटणी, मिरची पावडर, गारमेंट प्रॉडक्ट, मास्क इत्यादी अनेक वस्तू ॲमेझॉन या संकेतस्थळावर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. या वेळी प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन पानारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here