कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे डंगळवाडी येथे दुभाजकावर कार आदळून झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला. तर दोघे जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास झाला. या अपघातात  सुकुमार देवाप्पा चौगुले (वय २९, रा.मार्केट यार्ड, कोल्हापूर) हा तरुण जागीच ठार झाला. जखमींना रूग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याहून तवेरा कार  कोल्हापूरच्या दिशेने येत होती. त्यावेळी वागदे डंगळवाडी येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन जोरात आदळली. यात तरूण जागीच ठार झाला. तर दोघेजण जखमी झाले. एएसआय विनायक चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक पंचनामा केला. मृत चौगुले याचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी नेण्यात आला आहे.