कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून सतर्कता बाळगली जात आहे. एकाच दिवशी ६ जणांच्या अहवालात डेल्टा प्लसचे विषाणू आढळले आहेत.    

कोल्हापूर शहरात ३, हातकणंगलेमध्ये २ व निगवे दुमाला मध्ये १ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरात सापडलेल्या तीन रुग्णांपैकी १ रुग्ण विचारे माळ येथील असून २ रुग्ण सानेगुरुजी वसाहतींमधील आहेत.

हे सर्व रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या अहवालात डेल्टा प्लसचे विषाणू आढळून आले आहेत. हे रुग्ण राहत असलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात एका महिलेला डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचा अहवाल आला होता. मे महिन्यात तिला करोना झाला होता. त्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर तिचा अहवाल आला. पण तोपर्यंत बरी झाली होती. तरीही ती राहत असलेल्या परिसरात महापालिका अधिकाऱ्यांनी भेट देवून विविध उपाययोजना सुरू केल्या होत्या.