कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदीरात डिजिटल प्रणालीचा वापर करून सुरक्षा व्यवस्था आधुनिक करण्याच्या कामामध्ये उत्कृष्ट काम केले. तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम बनवले. यासाठी देवस्थान व्यवस्थापन समितीला धार्मिक, सार्वजनिक व्यवस्था गटांमध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल दिल्ली इथे  गौरविण्यात आले. यासाठी देवस्थान व्यवस्थापन समिती प्रशासक राहुल रेखावार यांचे मार्गदर्शन लाभले होते.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गेल्या वर्षभरातील डिजिटल सुरक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. मंदिरातील भाविकांची संख्या प्रतिवर्षी एक कोटीपेक्षा जास्त असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अद्यावत करण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, मल्टी झोन डोअर फ्रेम मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून डिजिटल सुरक्षा सिस्टीम मजबूत करण्यात आली. याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.

हा पुरस्कार देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, उपअभियंता सुयश पाटील, सीसीटीव्ही कक्षाचे प्रमुख राहुल जगताप यांनी स्विकारला. या पुरस्कारामळे पुन्हा एकदा कोल्हापूरची मान उंचावली आहे.