कोल्हापुरातील शाळांची प्रशासकांनी केली पाहणी

0
134

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोल्हापूर शहरात शाळा सुरु आहेत का, याची पाहणी आज (सोमवार) प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली. यावेळी त्यांनी शहरातील दोन शाळांना अचानक भेट दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शाळा सुरू नाहीत. परंतु पालकांचे हमीपत्र घेऊन काही माध्यमिक शाळा शहरात सुरू झालेल्या आहेत. या शाळांची पाहणी त्यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व प्रशासनाधिकारी शंकर यादव उपस्थित होते.

प्रथम त्यांनी महानगरपालिकेची राजमाता जिजामाता हायस्कूलला भेट दिली. तेथे इ. ९ वी आणि इ. १० वी चे वर्ग सुरु होते. प्रशासकांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन अध्यापनाचे निरीक्षण केले. मुलांची बैठक व्यवस्था पाहिली. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना हात धुवायला लावून ते योग्य पद्धतीने हात धुतात का ते पाहिले. आणि हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक स्वत: करुन दाखविले. थर्मल स्कॅनर व सॅनिटायजरच्या वापराबद्दल योग्य सूचना केल्या. सॅनिटायजरची उपलब्धता, कोरोना तपासणीबाबतचे RTPCR रिपोर्ट स्वत: पाहिले. पालक संमतीपत्रे, स्वच्छतागृहे, पुरेशा पाण्याची उपलब्धता, ऑक्सिमीटर, सामाजिक अंतराचे पालन इत्यादी बाबींची पाहणी केली.

यानंतर खाजगी व्यवस्थापनाचे वसंतराव ज. देशमुख हायस्कूलला त्यांनी भेट देवून नियोजनाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. थर्मल स्कॅनरचा वापर, सॅनिटायजर व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था पाहून त्याबाबत प्रशासक बलकवडे यांनी समाधान व्यक्त केले.