वाढीव वीजबिले भरणार नाहीच..! : कोल्हापूरवासीयांचा वाहन रॅलीद्वारे इशारा

0
138

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात महावितरणने भरमसाट बिले पाठवली होती. ती भरणार नाही, असा निर्धार करत कोल्हापूरवासीयांनी आज (गुरुवार) मोठ्या संख्येने एकत्र येत शहरातून वाहनांची रॅली काढली. या रॅलीत मोठ्या संख्येने दुचाकी, तीन चाकी, चारचाकी, आरामगाड्या, ट्रक, टेंपोधारक सहभागी झाली होते.

लॉकडाऊनच्या काळात महावितरणने अव्वाच्या सव्वा बिले पाठवली होती. या काळात सर्वच उद्योग व्यवसाय बंद होते. मात्र वीजबिल येणे सुरूच होते. अशा अन्यायकारक वीज बिलाच्या विरोधात कृती समितीने दंड थोपटले होते. तसेच वीज बिल माफ करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र त्या मागणीला शासनाने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे शहरातून वाहनांची रॅली काढण्यात आली. तसेच यावेळी वीज बिल भरणार नाही, असा निर्धार करण्यात आला.

आज सकाळी दहाच्या सुमारास या रॅलीला शहरातील गांधी मैदानातून सुरुवात झाली. ही रॅली शहरातील महाद्वार रोड, मनपा, सीपीआर, दसरा चौक, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज मार्गे आईचा पतळा, शाहू नाका येथून पुणे-बेंगलोर महामार्गावरून तावडे हॉटेल मार्गे पुन्हा शहरात आली. यामध्ये श्रीनिवास साळोखे, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, सुभाष जाधव, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रज यांच्यासह मोठ्या प्रमाणावर वाहनधारक आणि नागरिक सहभागी झाले होते.