कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन राबवले. इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाचा गुन्हा उघडकीस आणून एका संशयिताला अटक केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीची निवडणूक व कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रात्री बारा ते बुधवारी पहाटे पाच पर्यंत कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने कोल्हापूर, इचलकरंजी यासह जिल्ह्यामध्ये ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या दरम्यान तडीपार आरोपी, वॉरंटमधील आरोपी, फरारी आरोपी, सराईत गुन्हेगार, घरफोडीतील गुन्हेगार, मोटरसायकल चोरीचे आरोपी, जबरी चोरी करणारे आरोपी, चेन स्नॅचिंग मधील आरोपी, यांच्या झाडाझडती १४ दारूबंदी केसेस व ४ ओपन बारच्या केसस करण्यात आल्या.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, २ अपर पोलीस अधीक्षक, ६ पोलीस उपअधीक्षक, ८० पोलीस निरीक्षक व साहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक आणि ५०० पोलीस कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता.