कोल्हापूर महानगरपालिकेच्या २०२१ सार्वत्रिक निवडणूकीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध…

0
56

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२१ साठी प्रारुप मतदार यादी आज (मंगळवार) प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती महापालिकेच्या चार विभागीय कार्यालयात उपलब्ध झाली आहे. तसेच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

५ जानेवारी २०२१ पर्यंत प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील  ५ लाख ४९ हजार २३६ लोकसंख्या असून २०२१ च्या  सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या ४ लाख ६२ हजार ६९३ इतकी आहे. अशी माहिती प्रशासक कादंबरी बलकवडे आणि उपायुक्त रवींद्र अडसूळ यांनी दिली.

प्रशासक बलकवडे म्हणाल्या  की, प्रारूप यादी वर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी १६-२-२०२१ ते २३-२-२०२१ असा निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दिनांक 3 मार्च रोजी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. 8 मार्च  रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून १२ मार्च रोजी अंतिम प्रभाग निहाय व केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

प्रारुप मतदार यादीवर हरकती आणि सूचना आल्यानंतर  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे लेखनिकाच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले आहेत. तसेच संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही महानगर पालिकेच्या संबंधित प्रभागात मतदार यादीत नावे वगळली असल्यास ती  नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. या शिवाय इतर कोणत्याही दुरुस्त्या तसेच मतदार यादीत नवीन नाव नोंदणी किंवा पत्ता दुरुस्ती होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.