कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक मार्चमध्ये होणार…

0
386

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे मार्च महिन्यात ही निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या ८१ प्रभागासाठीचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे. त्याच्यावर आलेल्या हरकतीवर सध्या सुनावणी सुरू आहे. निवडणुकीचा पुढचा टप्पा म्हणून मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १६ फेब्रुवारीला प्रभानिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १२ मार्चला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या हालचाली पाहता मार्चच्या अखेरच्या टप्प्यात ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असतानाच आता महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकाचवेळी सहकारी संस्था व महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे.