…तोपर्यंत कोल्हापूर मनपा निवडणूक नको : भाजपची मागणी

0
61

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ फेब्रुवारीरोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. परंतु या प्रारूप यादयांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे समोर आले आहे. हजारो  मतदारांची नावे चुकीच्या प्रभागांच्या प्रारुप यादीत आली आहेत. तरी या सर्व याद्यातील घोळ मिटेपर्यँत महापालिका निवडणूक घेण्यात येऊ नये, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिला आहे.

याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे ईमेल द्वारे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की,  १८ आणि २३ फेब्रवारीरोजी रोजी भाजपच्या शिष्टमंडळाने उपायुक्त यांना प्रत्यक्ष भेटून  मतदार याद्यांतील सुरु असलेल्या गंभीर त्रुटीबाबत सविस्तर निवेदन दिले होते. यात अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या.  प्रभाग क्रमांक ३२ मध्ये २१६३, प्रभाग क्रमांक ३३ मध्ये सुमारे २१०० तर प्रभाग क्रमांक ४८ मध्ये सुमारे १८०० नावांवर हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या आहेत. व सध्याच्या प्रारूप याद्या रद्द करून नवीन प्रारूप याद्या कराव्यात, अशी मागणी  केली आहे.

त्याचबरोबर १६ फेब्रुवारीरोजी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या रद्द कराव्यात व पुन्हा नव्या प्रारूप याद्या तयार कराव्यात. हरकती दाखल करण्याची मुदत नवीन याद्या जाहीर झाल्यानंतर किमान १० दिवस ठेवावी. प्रारूप याद्यांचे प्रत्येक वॉर्ड स्तरावर जाहीर वाचन करावे. प्रारूप याद्या करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी भाजपने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, गायत्री राऊत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.