कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यातील आंबर्डे ता. पन्हाळा ते जरगी ता. गगनबावडा पर्यंतच्या सर्व बंधाऱ्यालगत कोल्हापूर पाटबंधारे विभागाने अचानक उपसा बंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

धामणी नदीमध्ये पाण्याचा अभाव असल्याने आंबर्डे ते जरगीपर्यंत शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी आपापसात पैसे काढून मातीचे बंधारे घालून शेतीसाठी पाणी अडवले जाते. परंतु, कोल्हापूर पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता आर.पी बांदिवडेकर यांनी या भागातील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता दिनांक १ डिसेंबर रोजी रात्री उपसाबंदीची नोटीस काढली. आणि त्यानुसार महावितरण विभागाकडून येथील शेतकऱ्यांच्या शेतीचा वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य वीज कनेक्शन बंद करण्यात येऊन उपसा करणाऱ्यां वर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

तर पाटबंधारे विभागाने अचानक दिलेल्या या उपसा बंदी आदेशामुळे भागातील काही शेतकऱ्यांनी ऊस लावण्यासाठी कांडी वातरणे, मका घालणे ही कामे करून ठेवली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. नेहमी मनमानी कारभार करणाऱ्या कोल्हापूर पाटबंधारे विभागाने केलेली उपसाबंदी व महावितरण विभागाकडून वीज पुरवठा बंद केल्याने धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांकडून पाटबंधारे विभाग व महावितरण, कळे उपविभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे उपसाबंदी आदेश तात्काळ मागे न घेतल्यास येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.